चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरातील निवासस्थानी सीमा भागातील कार्यकर्ते जमा, प्रचंड पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 10:50 AM2018-01-23T10:50:08+5:302018-01-23T11:23:41+5:30
सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत.
कोल्हापूर : सीमावासीयांच्या भावना दुखावतील असे विधान केल्याचा निषेध करण्यासाठी सीमा भागातील कार्यकर्ते मोर्चाने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात असलेल्या निवासस्थानी जमा होत आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी बेळगावहून निघालेले कार्यकर्ते आताच कोल्हापूरात पोहोचले असून त्यांना रोखण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त मागविण्यात आलेला आहे.
महसूलमंत्री व सीमाप्रश्नाचे समन्वयकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोकाक तालुक्यातील तवग येथे मंदिर उद्घाटन कार्यक्रमावेळी कन्नडमधून अभिमानी गीत गायल्याने सीमाभागात संताप व्यक्त होत आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारची कन्नडसक्ती सुरू असताना महाराष्ट्रातील मंत्र्यानेच कन्नडमधून गीत गायल्याने नवा वाद सुरू झाला आहे.
यामुळे सीमाभागातून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी युवा मंच एकीकरण समितीने याचा निषेध केला असून बेळगावातील सोशल मीडियात देखील पाटील यांचा निषेध होत आहे.
दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वयक मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि येळ्ळूर विभाग समितीचे राजू पावले यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.