मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांचा निषेध;‘सकल मराठा’चे तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:11 AM2018-11-26T01:11:22+5:302018-11-26T01:11:27+5:30
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज, सोमवारी मुंबईत निघणाऱ्या गाडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वसंतराव मुळीक, दिलीप ...
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज, सोमवारी मुंबईत निघणाऱ्या गाडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे यांच्यासह प्रताप नाईक यांना पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतल्याचे पडसाद उमटले. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांचा निषेध करीत दसरा चौकात सायंकाळी तब्बल दीड तास ठिय्या आंदोलन केले. कोणत्याही परिस्थितीत गाडी मोर्चा काढणारच, असा इशारा यावेळी देण्यात आला.
समन्वयकांना अटक केल्यामुळे याचा निषेध नोंदविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी सायंकाळी साडेपाच वाजता दसरा चौकात एकत्र येण्याची हाक दिली. त्यानुसार स्वप्निल पार्टे, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, सचिन तोडकर, शाहीर दिलीप सावंत, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, गणी आजरेकर, कादर मलबारी, संजय जाधव, प्रकाश पाटील, मनोज नरके, शुभम शिरहट्टी यांच्यासह सर्व कार्यकर्ते एकवटले. यानंतर सरकारचा निषेध करीत राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’सह मुख्यमंत्री, पालकमंत्री व सरकारविरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शशिकांत पाटील, उत्तम जाधव, संजय जाधव, शैलजा भोसले, दिलीप पोवार, कादर मलबारी, अॅड. अजित चव्हाण, आदींनी समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याबद्दल सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. तसेच जोपर्यंत त्यांना सोडत नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा इशारा दिला. ते कुठे आहेत, त्यांना कोठे नेण्यात आले आहे, अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांकडे केली. यावेळी अवधूत पाटील व स्वप्निल पार्टे यांनी वसंतराव मुळीक व इंद्रजित सावंत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला अटक केली नसून ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळपर्यंत आम्हाला सोडून देण्यात येईल; परंतु कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढायचाच, असे सांगितले.
स्वप्निल पार्टे यांनी मोर्चामध्ये विस्कळितपणा आणण्यासाठीच मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी समन्वयकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला. तसेच आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता दसरा चौक येथून २६-११ मधील शहिदांना अभिवादन करून गाडी मोर्चा काढला जाईल, असा निर्धार व्यक्त करीत यावेळी ‘कोल्हापूर बंद’ राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आजी-माजी नगरसेवकांचाही आंदोलनात सहभाग
दरम्यान, जिल्हा बॅँक संचालक भैया माने, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, नगरसेवक शारंगधर देशमुख, दिलीप पोवार, अर्जुन माने, डॉ. संदीप नेजदार, लाला भोसले, मोहन सालपे, आदींसह कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आजी-माजी नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारचा निषेध नोंदविला.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
सकल मराठा समाजाच्या समन्वयकांना ताब्यात घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवीत ठिय्या आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर दसरा चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी समन्वयकांना अटक केली नसून, ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले; परंतु आक्रमक आंदोलकांनी त्यांना ताब्यात का घेतले, अशी विचारणा केल्यावर, पोलीस निरुत्तर झाल्याचे दिसत होते.