कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये सुमारे ३५ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार झाली आहे का, अशी विचारणा जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे.निंबाळकर यांनी या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या कार्यालयात दिले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. मात्र ही खरेदी करताना शासनाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला नाही. जाहीर निविदा, ई-निविदा, दरकरार न करता ही खरेदी करण्यात आली आहे, असा आरोप निंबाळकर यांनी निवेदनातून केला आहे.
साहित्यखरेदीचा प्राधान्यक्रम कसा ठरवला, वितरण करताना कोणते निकष लावण्यात आले, वितरण कुठे कुठे झाले, सर्वसाधारण नागरिकांसाठी याचा किती उपयोग झाला, हे साहित्य खरेदी करताना अर्सेनिक अल्बम गोळ्यांसाठी तरतूद का करण्यात आली नाही, असे प्रश्न या निवेदनातून विचारण्यात आले आहेत. तसेच दानशूर नागरिकांनी कशा प्रकारे मदत केली, किती क्वारंटाईन केंद्रे सुरू करण्यात आली आणि किती नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले, अशीही विचारणा निवेदनातून करण्यात आली आहे.