पुरग्रस्त बांधकाम कामगारांना घरबांधणीसाठी ५ लाख अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 06:57 PM2021-07-28T18:57:18+5:302021-07-28T19:01:35+5:30
Flood Kolhapur : महापुर व अतिवृष्टीमुळे ज्या बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधणीसाठी कल्याणकारी मंडळाने तात्काळ ५ लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केली.तसेच, ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्या नोंदीत कामगारांना प्रत्येकी ५०हजारांचे अर्थसाहाय्य करावे अशी मागणी करत यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्ता पाटील
म्हाकवे : महापुर व अतिवृष्टीमुळे ज्या बांधकाम कामगारांची घरे पडली आहेत त्यांना घर बांधणीसाठी कल्याणकारी मंडळाने तात्काळ ५ लाखांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी केली.तसेच, ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्या नोंदीत कामगारांना प्रत्येकी ५०हजारांचे अर्थसाहाय्य करावे अशी मागणी करत यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बानगे (ता.कागल)येथे पुरामुळे अनेक बांधकाम कामगारांच्याच घरांची पडझड झाली आहे, त्याची पाहणी मगदूम यांनी केली. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष विक्रम खतकर, उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील, मोहन गिरी-साकेकर, राजू आरडे (आणूर),युवराज शिंदे आदी उपस्थित होते.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे 11 हजार कोटी रुपये पडून असल्याचे सांगत मगदूम म्हणाले, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बांधकाम कामगार दुसर्याना निवारा निर्माण करून देण्यासाठी राबत असतो. परंतु,नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कामगारांना बेघर होण्याची वेळ आली आहे. यावेळी अमर पाटील, शिवाजी पाटील,गोविंद बोंगार्डे आदी कामगार उपस्थित होते.
पंचनामे तात्काळ पुर्ण करा : मगदुम
यावर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक सामान्य कुंटुंबांच्या घरांची पडझड झाली, पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे.शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी मगदूम यांनी केली.