जिल्ह्यात १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:22+5:302020-12-22T04:24:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील बालकांसाठी १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील बालकांसाठी १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सॅनिटायझर, मास्क व ग्लोव्हजचा वापर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीनुसार या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना या दिवशी पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी केले. याअंतर्गत ३ लाख २० हजार बालकांना ही लस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा. सं.) डॉ. हर्षला वेदक, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. फारूक देसाई आदी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी या मोहिमेची माहिती दिली. या दिवसानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घरभेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी २ हजार ४५१ आयपीपीआय टीमच्या घरभेटीद्वारे सर्व बालकांना पोलिओ लस दिल्याची खात्री करण्यात येणार आहे व वंचित लाभार्थ्यांना तत्काळ पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.
--
शेवटचा रुग्ण १९९९मध्ये
जिल्ह्यात शेवटचा पोलिओ रुग्ण २३ ऑगस्ट १९९९ मध्ये शाहूवाडी तालुक्यात करंजोशी या गावी आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. २०२१ मध्ये ही मोहीम एकदाच होणार असल्यामुळे १०० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी मिळून २ हजार १५ लसीकरण केंद्राची, ६६९ मोबाईल टीम, ३१४ ट्रान्झीट टीमची स्थापना करण्यात आली आहे.
---
फोटो नं २११२२०२०-कोल-पोलिओ लसीकरण
ओळ : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पोलिओ लसीकरणाबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक झाली. यावेळी डॉ. योगेश साळे, डॉ. अशोक पोळ, डॉ. हर्षला वेदक, आशा उबाळे, डॉ. फारूक देसाई उपस्थित होते.
---
इंदुमती गणेश