कोल्हापूर : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ९०० जणांनी मतदार नोंदणीची प्रक्रिया सोमवारपर्यंत पूर्ण केली. मतदार नोंदणी करण्याची बुधवारी (दि. ६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे.पुणे पदवीधर, शिक्षक आमदार मतदारसंघाची निवडणूक जून २०२० मध्ये होत आहे. ३१ आॅक्टोबर २०१६ पूर्वीचे पदवीधारक मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. निवडणूक विभागाकडून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. बुधवारपर्यंत नोंदणी पूर्ण करून मतदार यादी अंतिम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत. त्यानुसार नोंदणीचे काम निवडणूक विभागाकडून सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत ४ हजार ५०० जणांनी पदवीधर, तर दोन हजार ४०० जणांनी शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी केली आहे.
नोंदणीच्या अर्जासमवेत पात्रतेचा पुरावा म्हणून देण्यात येणारी प्रमाणपत्रे, रहिवासी दाखला, आदी कागदपत्रे राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक आहे. निवडणूक विभागाने निश्चित करून दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी सोमवारी केले आहे.
अर्ज जमा करण्यास गर्दीदरम्यान, मतदार नोंदणीसाठी दोन दिवस उरले असल्याने अर्ज जमा करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये पदवीधर, शिक्षकांची गर्दी झाली आहे. पदवीधर आणि शिक्षक आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून मतदार नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
कोल्हापूर (जिल्हा) बौद्ध-अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे यांनी पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. बहुजन समाजातील पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी करून या निवडणुकीत सक्रिय व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय सेवा समितीचे अध्यक्ष फारूक एम. कुरेशी यांनी केले आहे.