कोल्हापूर : पुण्यातून बेपत्ता झालेले उद्योजक गौतम पाषाणकर यांचे मोबाईलचे अंतिम लोकेशन कोल्हापुरातील ताराराणी चौकात दिसून आल्याने त्यांच्या तपासासाठी पुणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक दोन आठवडे कोल्हापुरात ठिय्या मारुन आहे. त्यांनी तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यांनी कोल्हापूरपोलिसांची मदत न घेता परस्पर शोध कार्य सुरू केले असल्याची माहिती पुढे आली आहे.पुणे येथील ॲटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबरपासून पुण्यातून गायब झाले आहेत. त्यांनी वाहनचालकांकडे लिफाफ्यातून सुसाईड नोट दिल्याने त्यांचे कुटुंबीय हादरले. पुणे पोलिसांनी पाषाणकर यांच्या शोधासाठी सहा पथके तयार करून राज्यभर विशेषत: कोकणात तपासासाठी पाठवली आहेत. पैकी एक पथक दोन आठवडे कोल्हापुरात ठिय्या मारून गोपनीय पद्धतीने तपास करत आहे.पाषाणकर पुण्यातून गायब झाले त्याच दिवशी दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्या मोबाईलचे अंतिम लोकेशन कोल्हापुरात ताराराणी चौकात दाखवले. त्यानुसार पथकाने आठवड्यापूर्वी ताराराणी चौकातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानातील सीसी कॅमेरे तपासले. त्यामध्ये पाषाणकर हे ताराराणी चौकात आले. त्यांनी मोटारीतून उतरुन एका रेस्टॉरंटमधून जेवणाचे पार्सल घेतले व पायी रस्त्याने गेल्याचे सीसी टीव्ही फुटेज शोध पथकाच्या हाती लागले. त्यानुसार पोलिसांनी ताराराणी चौकांसह कोल्हापुरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी केली, पण ते आढळले नाहीत.शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्याकडेही चौकशी केली. त्यांनीही मदतीची तयारी दर्शवली होती, पण शोध पथकाने कोल्हापूर पोलिसांची मदत न घेताच गोपनीय पद्धतीने शोध कार्य सुरू केले आहे.
पुण्यातून गौतम पाषाणकर यांच्या तपासाबाबत शोध पथके कोल्हापुरात शोध कार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे, पण त्यांनी अद्याप आपल्याशी अधिकृतपणे संपर्क साधलेला नाही. तपास कामासाठी मदत मागितल्यास निश्चितच सहकार्य करू.- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर