कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला (शुक्रवारी) पहाटे कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची भाऊगर्दी होती. यावेळी मंदिर परिसरात मिळून आलेली महिला भक्ताची पर्स बंदोबस्ताला असणारे पोलीस हवालदार बंडा सावेकर यांनी प्रामाणिकपणे परत केली.नवरात्रौत्सवामुळे मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी होती. मंदिर व भाविकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी चौवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सरस्वती मल्हाडी (वय ३५, रा. गोकाक-कर्नाटक, सध्यारा. बिनखांबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर) या शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्या होत्या.गर्दीमध्ये त्यांची पर्स हरवली. त्यामध्ये ६ हजार ८०० रुपये, आधार कार्ड यासह अन्य महत्वाची कागदपत्रके होती. पर्स हरविल्याने त्या सैरभैर झाल्या होत्या. त्यांनी बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीसांना याप्रकाराची माहिती दिली. दरम्यान मंदिर परिसरात पहाटेपासून हवालदार बंडा सावेकर बंदोबस्ताला होते. त्यांना ही पर्स मिळून आली.
आधार कार्डवरुन त्यांनी ती जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेने दिलेली तक्रारीवरुन मल्हाडी यांना बोलवून घेत खात्री करुन त्यांची पर्स परत केली. पैसे आणि आधारकार्ड सुखरुप असल्याचे पाहून त्यांनी पोलीसांचे आभार मानले.