बाह्यरुग्ण विभागाचा प्रश्न पुन्हा लटकला!

By admin | Published: October 26, 2014 10:22 PM2014-10-26T22:22:54+5:302014-10-26T23:28:02+5:30

प्रशासकीय उदासीनता : बांधकामाची निविदा प्रक्रिया कधी?

The question of the outpatient section hangs again! | बाह्यरुग्ण विभागाचा प्रश्न पुन्हा लटकला!

बाह्यरुग्ण विभागाचा प्रश्न पुन्हा लटकला!

Next

सचिन लाड : सांगली :गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात नवीन ओपीडी (बाह्यरुग्ण) विभाग बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा लटकला आहे. राज्य शासनाने मंजुरी देऊन निधीचा पुरवठा आहे. केवळ सार्वजनिक बांधकाम विभागास मुहूर्त सापडत नसल्याने गेल्या अडीच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. रुग्णालय प्रशासनही याचा पाठपुरावा करण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालय सुधारणेसाठी राजकीय व प्रशासकीय स्तरावर अनेकदा प्रयत्न होऊनही त्याला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. कधी रुग्णालय प्रशासन, कधी वैद्यकीय शिक्षण, तर कधी सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीस कारणीभूत ठरत आहे. इमारत उभारणी, दुरुस्ती अशा कामांसाठी केंद्र शासनाने दोन वर्षापूर्वी १८ कोटी रुपये सांगलीच्या शासकीय रुग्णालयास मंजूर केले आहेत. यापैकी साडेसहा कोटी रुपये नव्या बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीसाठी प्राप्तही झाले. सध्या ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांच्याहस्ते अडीच वर्षापूर्वी नव्या बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीच्या कामाचा प्रस्ताव तयार केला व तो वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविला.
प्रशासकीय मंजुरीअभावी दीड वर्षे ही फाईल पडून होती. सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्याकडून अद्यापही काहीच हालचाली नाहीत. (प्रतिनिधी)
पाठपुरावा नाही
शासकीय रुग्णालयातील अस्वच्छता, आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. निधी मिळूनही त्याचा पाठपुरावा व खर्च करण्याची धडपड प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही. तसेच उपलब्ध इमारतीच्या जागेचाही योग्य वापर केला जात नाही. अनेक ठिकाणची जागा विनावापर पडून आहे. सुधारणेच्या सर्व पातळ््यांवर अपयश आलेले दिसत आहे.

Web Title: The question of the outpatient section hangs again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.