इचलकरंजी : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे अनेक नागरिकांना जगणे मुश्किल झाले. काही जणांना दोनवेळचे जेवण मिळणेही कठीण होऊन बसले. अशा काळात कष्टकरी, मजूर, बेघर, गरीब असणाऱ्या अनेकांसाठी शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे; मात्र केंद्रावरील गर्दी पाहता थाळींची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी जाहीर केली. कोरोना काळात शिवभोजन थाळीची सुरुवातीची किंमत १० रुपये ठेवण्यात आली. नंतर ती ५ रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली; परंतु राज्यात संचारबंदी लागू करताना मुख्यमंत्र्यांनी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक गरजूंची किमान एक वेळ तरी भूक भागू लागली.
राज्य शासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अंतर्गत 'ब्रेक द चेन'ची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले. हाताला काम नसल्याने सर्वसामान्य माणसाला आपल्या रोजीरोटीची काळजी लागून राहिली. इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्याही मोठी आहे. अनेक परप्रांतीय लोकही मोठ्या संख्येने राहतात. अशा निराश्रित, निराधार, बेघर नागरिकांना शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून रोजच्या जेवणाची सुविधा होत आहे.
चौकटी
शिवभोजन केंद्र व थाळी वाढवण्याची मागणी
सध्या शहरात चार ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ५६१ लोकांना शिवभोजन थाळी दिली जाते. शहराचा विस्तार मोठा आहे, तसेच गरजवंतांची संख्याही अधिक आहे. त्याप्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची संख्या व थाळी वाढवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
लोकांचा चांगला प्रतिसाद
शिवभोजन केंद्रावर दोन पोळी, एक भाजी, वरण व भात अशा चांगल्या दर्जाचा मेनू दिला जातो. कोरोनामुळे सध्या प्रत्येक केंद्रावर पार्सलची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभोजन केंद्रावर लोकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत असून, अवघ्या तासाभरात केंद्रावरच्या थाळी संपतात.
.
शहरात शिवभोजन थाळी केंद्रांची माहिती
सध्या गरज १)ज्ञानेश्वर कॅटरर्स २२५ १०० २)हॉटेल अन्नपूर्णा ११२ ७५ ३)हॉटेल शिदोरी ११२ ५० ४)हॉटेल मातोश्री ११२ ५०
फोटो ओळी
०६०५२०२१-आयसीएच-११
इचलकरंजीत शिवभोजन थाळी केंद्रावर रांगा लावून लाभार्थी जेवण घेत आहेत.
०६०५२०२१-आयसीएच-१२
महिला लाभार्थ्यांना तात्पुरते सावलीसाठी अन्यत्र बसविण्यात आले आहे; परंतु फिजिकल डिस्टन्स ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याने धोका पत्करून जेवण घ्यावे लागत आहे.
सर्व छाया-उत्तम पाटील