कोल्हापूर : दुर्गराज रायगडावर देशभरातील लाखो शिवभक्तांची उपस्थिती आणि विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा गुरुवारी (दि. ६) दिमाखात साजरा होणार आहे. यावर्षी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ आणि ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे मुख्य आकर्षण असणार आहे; त्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक खासदार संभाजीराजे, शहाजीराजे आणि पाच देशांचे राजदूत प्रमुख उपस्थित असतील, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
फत्तेसिंह सावंत म्हणाले, या सोहळ्यानिमित्त रायगडावर बुधवारी (दि. ५) सायंकाळी ‘जागर शिवकालीन युद्धकलेचा’ हा मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होणार आहे. त्यात राज्यातील ३० हून अधिक युद्धकला आखाडे सहभागी होतील; त्यासाठी आतापर्यंत १२ आखाड्यांनी नोंदणी केली आहे. यावेळी शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळांच्या वस्तादांचा सत्कार केला जाणार आहे.या वर्षीच्या सोहळ्यासाठी बल्गेरियाचे राजदूत इलेनोरा डिमिट्रोव्ह, पोलंडचे काउन्सिल जनरल डॅमिन इरझॅक, पोलंडचे तिसरे सेक्रेटरी इवा स्टॅन्किविझ, ट्युनिशियाचे राजदूत नेजमेद्दिन लाखल, चिनचे वरिष्ठ अधिकारी लुई बिंगे उपस्थित राहणार आहेत.गुरुवारी सकाळी मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर ‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ ही पालखी मिरवणूक सुरू होईल. १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांसह सर्व धर्मांतील लोकांच्या सहभागाने मिरवणूक रंगणार आहे. पारंपरिक लोककलांचा जागर या मिरवणुकीत होणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजार पेठ ते जगदीश्वर मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग आहे. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी व्हावे. या पत्रकार परिषदेस हेमंत साळोखे, संजय पवार, अमर पाटील, उदय घोरपडे, शहाजी माळी, यशवंत गोसावी, आदी उपस्थित होते.3विविध ४० समित्यांद्वारे तयारीया सोहळ्याची विविध ४० समित्यांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. रायगड जिल्हा, पोलीस प्रशासन आणि शिवभक्तांच्या विविध संघटनांची मोठी मदत होत आहे. कोल्हापुरातून गेल्यावर्षी १७०० चारचाकी वाहनांनी शिवभक्त या सोहळ्यासाठी आले होते.यंदा त्यामध्ये वाढ होईल. अन्नछत्राचे काम पाहणारे पथक सोमवारी (दि. ३) कोल्हापूरहून रवाना होईल, असे हेमंत साळोखे यांनी सांगितले.