शिरोळ : तहसीलदारांचा आदेश धाब्यावर बसवून शिरोळ तालुक्यात सर्रास नियमांचे उल्लंघन करून वाळू वाहतूक सुरू आहे. वाळू ट्रकमधून वाहतूक करताना ती अच्छादित करून नेण्याबाबत ठराव आमसभेत झाला होता. ‘आमसभा जोमात आणि ठराव कोमात’ अशी परिस्थितीत तालुक्यात निर्माण झाली आहे. शिवाय कर्नाटकातून बेकायदेशीर वाहतूकदेखील शिरोळ तालुक्यात सुरू आहे. यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वाळूचे आगर म्हणून शिरोळ तालुक्याची ओळख आहे. प्रत्येकवर्षी या-ना त्या कारणाने वाळू उपसा चर्चेत येतो. आॅक्टोबरनंतर वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू होऊन डिसेंबरमध्ये लिलाव होतात. लिलाव घेण्यासाठी कोटीच्या स्पर्धा होत आहेत. यामुळे शासनाला महसूलही चांगला मिळू लागला आहे. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघनच होत आहे. ट्रकमधून उघड्यावर वाळू असल्याने वाळूचे कण रस्त्यावर पडण्याबरोबरच हवेत पसरल्यामुळे हवा प्रदूषणाबरोबर मोटारसायकलधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. ७ जानेवारीला शिरोळ येथे झालेल्या आमसभेत तहसीलदार सचिन गिरी यांनी वाळू वाहतूक ही ताडपत्रीने आच्छादित करूनच वाहतूक करण्याचा नियम असल्याचे सांगितले होते. यावेळी अशी वाहतूक होत असल्यास अशा वाहतुकीवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. यावेळी तसा ठरावही करण्यात आला होता. मात्र, तहसीलदारांचे हे आदेश वाहतूकदारांनी मोडून काढल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. बिनदिक्कतपणे वाळू वाहतूक सुरू आहे. याकडे वाहतूक पोलीस, महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)
शिरोळमध्ये वाळू वाहतूक जोमात, ठराव कोमात
By admin | Published: February 24, 2016 1:02 AM