पावसाची उघडीप, पण पंचगंगेच्या पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:19+5:302021-09-15T04:28:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतली. कोल्हापूर शहरात दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाची उघडीप असली, तरी पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांनी वाढ झाली. विविध नद्यांवरील ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून विसर्ग कमी झाला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारी दिवसभर तर धरणक्षेत्रात धुवांदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला होता. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत जाऊन पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले होते. सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस सुरू राहिला. मात्र, मंगळवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली. अधूनमधून भुरभुर वगळता उघडीप राहिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर कडकडीत ऊन राहिले. तब्बल चार दिवसांनी मंगळवारी सूर्यनारायणांचे दर्शन झाले. पावसाने उसंत घेतली असली, तरी मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत पंचगंगेची पातळी ३०.६ फुटांवर होते. मात्र, सायंकाळी ती ३२.४ फुटांवर पोहोचली होती. धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची पातळी स्थिर राहण्याची शक्यता आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली असून, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १,४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पडझडीत ४.३६ लाखांचे नुकसान
सोमवारी झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्यात ११ खासगी मालमत्तांची पडझड होऊन, त्यामध्ये ४ लाख ३६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.