कोल्हापूर : शहरात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला. किरकोळ सरी वगळता पावसाने उघडीप दिली. मात्र, दोन दिवसांच्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
गुरुवार (दि. ११) पासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी पहाटेपासून काही प्रमाणात उसंत घेतली. सकाळपासून दिवसभरात शहरात अधूनमधून पावसाचा शिडकावा होत होता. काही काळ उन्हाचे दर्शन झाले. पावसाचा जोर ओसरला तरीही पंचगंगा नदीचे पाणी प्रथमच पात्राबाहेर पडले. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली. सकाळी गायकवाड वाड्यालगत पाणी होते, तर दुपारनंतर त्यात वाढ होऊन ते जामदार क्लबकडे सरकले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा मार्ग लोखंडी बॅरिकेटस् टाकून रस्ता बंद केला. पावसाचा जोर ओसरला तरीही शहरातील बिंदू चौक, भाऊसिंगजी रोड, कोळेकर तिकटी, सीपीआर चौक, दाभोळकर कॉर्नर, स्टेशन रोड, कावळा नाका, आदी परिसरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र दिसत होते. राजारामपुरी जनता बझार, लक्ष्मीपुरी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, आदी ठिकाणी पाणी साचून होते. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणची गटारे व ड्रेनेज साफ केल्यामुळे पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे रस्ते किंवा वाहतूक बंद झाली नाही.
दूधगंगा पात्राबाहेरशिरोळ / दत्तवाड : शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणक्षेत्रात कोसळणाºया पावसामुळे तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दोन फुटाने वाढ झाली तर दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून दोन्ही बाजूंची गवताची कुरणे पाण्यात गेली आहेत.
पुराच्या पाण्यामुळे तेरवाड, शिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नृसिंहवाडीत दत्त मंदिरात पाणी आले आहे तर शिरढोण-कुरुंदवाड, नांदणी-शिरढोण मार्गदेखील बंद झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी नृसिंहवाडी येथे कृष्णेची पाणी पातळी ४५ फूट, राजापूर बंधाºयावर ३४.०९ तर शिरोळ बंधाºयावर पंचगंगेची पाणी पातळी ४७ फूट, तेरवाड बंधाºयावर ५३.०९ तर दिनकरराव यादव पुलावर ४५ फूट होती. दत्तवाड येथील दूधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून घोसरवाड- सदलगा, दत्तवाड-मलिकवाड, दत्तवाड-एकसंबा या बंधाºयावर पाणी आले आहे.
खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टीकोल्हापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. यावर महापालिकेकडून मुरूम टाकून ते भरण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. एवढीच मलमपट्टी केल्यानंतर पुन्हा पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते, असे चित्र वारंवार दिसून येते. तरीही ही मलमपट्टी कशासाठी, असा सवाल वाहनधारकांमधून विचारला जात आहे. विशेषत: रिक्षाचालक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले आहेत.