कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून रोज हजेरी लावणाऱ्या वळवाच्या पावसाने बुधवारी मात्र पूर्णपणे विश्रांती घेतली. मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत दमदार कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे बुधवारी सकाळपर्यंत हवेत गारवा होता. दुपारपासून उष्म्याचा चटका पुन्हा सुरू झाला. आज गुरुवारपासून पुन्हा उन्हाचा चटका वाढणार आहे.
गेल्या आठवडाभर कमी- अधिक प्रमाणात वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. चार दिवसांपासून मात्र रोज दुपारनंतर पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. सोमवार आणि मंगळवार सलग दोन दिवस कोसळलेल्या धुवाधार पावसामुळे नको- नको म्हणण्याची वेळ आली. पावसामुळे पाडव्याच्या खरेदीवरही पाणी पडले. बुधवारी मात्र अजिबातच पाऊस नसल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. आजपासून लॉकडाऊन सुरू होत असल्याने संध्याकाळी ८ वाजेच्या आधी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांत तोबा गर्दी झाली होती. पाऊस नसल्याने ही खरेदी निर्विघ्नपणे पार पडली.
दरम्यान, दिवसभर वातावरण निरभ्र व कोरडे राहिल्याने आता येथून पुढे उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. सरासरी तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंशापर्यंत राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमान वाढत जाऊन आणखी वादळी पावसाचा सामना करावा लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.