पूरग्रस्त भागातील ६५५ टन कचरा उठाव, प्रशासक बलकवडे यांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 11:25 AM2021-07-28T11:25:17+5:302021-07-28T11:27:32+5:30
Kolhpaur Flood Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दोन हजार कर्मचारी राबत आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ३६ कर्मचाऱ्यांचे एक पथक कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहे.
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दोन हजार कर्मचारी राबत आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ३६ कर्मचाऱ्यांचे एक पथक कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहे.
रविवारच्या मोहिमेत १०० टन, सोमवारच्या मोहिमेत ३०० टन, तर मंगळवारच्या स्वच्छता मोहिमेत २५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. शहरातील पूरबाधित क्षेत्रात साचलेला गाळ व कचरा उठाव, औषध व धूर फवारणीची ही मोहीम शुक्रवारअखेर सुरू राहणार आहे.
महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी स्वच्छता मोहिमेदरम्यान संवाद साधला. यावेळी बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान ताराबाई पार्क, कदमवाडी, कुंभार गल्ली, कपूर वसाहत, साळोखे पार्क कदमवाडी या ठिकाणी पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आपल्या परिसरात स्वच्छता, औषध व धूर फवारणी करण्यात येते का याची खात्री करून घेतली. शाहूपुरी कुंभार गल्ली येथील धोकादायक घरामधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्राच्या ठिकाणी स्थालांतरित करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना दिल्या.
मुंबईची दोन जेट मशीन कोल्हापुरात
मुंबई महानगरपालिकेकडून कोल्हापूरला दोन जेट कम सक्शन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या सक्शन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख ड्रेनेज लाईन साफ करणे व चोकअप काढण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले.
नवी मुंबईहून ३६ कर्मचाऱ्यांचे पथक दाखल
प्रशासक बलकवडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना फोनवरून महानगरपालिका क्षेत्रातील पूर ओसरू लागल्याने स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची पथक पाठवून सहकार्य करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार ३६ कर्मचाऱ्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.