ग्राऊंड रिपोर्ट : राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:39 PM2021-07-29T17:39:18+5:302021-07-29T17:41:51+5:30
Flood Kolhapur : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.
कोल्हापूर : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार दि. १९ जुलैपासून दुकाने सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला. मात्र, तीननंतर जोरदार पाऊस आणि महापुरामुळे पुन्हा चार दिवस दुकाने बंद झाली.
पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून दुकाने पूर्ववत सुरू झाली. राजारामपुरी व्यापारपेठेत रेडिमेड गारमेंट, ज्वेलर्स, गिफ्ट आर्टीकल, फूड प्रॉडक्ट, मेडिकल, आदी १,७०० दुकाने आहेत. त्यातील ८० दुकानांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोरोनानंतर महापुरातून सावरून दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे.
राजारामपुरी व्यापारपेठ दृष्टिक्षेपात
- दुकानांची संख्या : १,७००
- वार्षिक उलाढाल : ७०० कोटी
व्यापार, व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत आहे. पण, राजारामपुरीतील बहुतांश दुकाने १० वाजता उघडण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कोरोना आणि महापुराचा बसलेला फटका लक्षात घेऊन शासनाने सर्व दुकाने रात्रीनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. विकेंड लॉकडाऊनही रद्द करावा.
-ललित गांधी,
अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन
गेल्या तीन दिवसांपासून राजारामपुरीतील आमचे दुकाने पूर्ववत सुरू झाले आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यवहारांची गतीही वाढत आहे. दुकाने सुरू ठेवण्याची सध्याची वेळ गैरसोयीची ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आम्हा सर्व व्यापाऱ्यांना वाढवून मिळावी.
- प्रशांत पोकळे,
मालक, बालाजी कलेक्शन