विठ्ठल नामाच्या शाळेत रमले बाल वारकरी.. दिंड्यांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:45 PM2018-07-21T15:45:28+5:302018-07-21T15:52:14+5:30
विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.
कोल्हापूर : विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली..असा हा विठ्ठल, रखुमाई आणि त्यांच्या भक्तीत दंग झालेले वारकरी शाळा-शाळांमध्ये अवतरले. ज्ञानाच्या मंदिरात भोळ््या विठ्ठलाची आळवणी झाली आणि शनिवारी बाल वारकऱ्यांनी दिंडीचा आनंद अनुभवला.
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भाविकांच्या लाडक्या विठूरायाची आषाढी एकादशी सोमवारी होत आहे. महिन्याभरापूर्वी सुरु झालेल्या दिंड्या आता पंढरपुरात विठ्ठल भेटीसाठी विसावल्या आहेत. एकादशीला आता एका दिवसाचा अवघी राहिला आहे.
रविवारमुळे शाळांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये शनिवारीच आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. एरवी शाळेच्या गणवेशात असलेले मुलं-मुली शनिवारी मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळीला बुक्का, गळ््यात टाळ, आणि मुली नऊवारी, केसात गजरा, साजश्रृंगार, डोक्यावर तुळस अशा सुंदर वेशभूषेत आले.
एक मुलगा आणि मुलगी विठूराय व रखूमाई झाले. पठडीतल्या अभ्यासाला सुट्टी मिळाली आणि हे बाल वारकरी विठ्ठल भक्तीच्या शाळेत रमले. परिसरातून दिंडी काढण्यात आली.
दरम्यान एकादशीची पूर्वतयारी म्हणून मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराला रंगरंगोटी व रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांच्या रांगा लावण्यासाठी बॅरिकेटींग करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी मंदिरापासून नंदवाळसाठी पायी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
दिंडी बिनखांबी गणेश मंदिर-निवृत्ती चौक, उभा मारुती-खंडोबा तालीम-जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी येथे पोहोचणार आहे. येथील मोकळ्या जागेत रिंगण सोहळा होणार आहे. काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा पालखी दिंडी पिराचीवाडी, वाशी मार्गे श्री क्षेत्र नंदवाळसाठी मार्गस्थ होईल.
उपवासाच्या पदार्थांना मागणी..
एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. वरीचे तांदूळ, साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा लाडू, केळी, चिक्की, खजूर या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरु होती.