कोल्हापुरात आढळली दुर्मीळ मेढशिंगी वृक्ष, जतन, संरक्षण आणि संवर्धन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:59 AM2018-07-21T10:59:39+5:302018-07-21T11:01:41+5:30

कोल्हापूर शहरात एकमेव असणाऱ्या वृक्षांच्या यादीत आता ‘मेढशिंगी’ या वृक्षाची भर पडली आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना कोल्हापूर शहराच्या परिसरात पाडळकर कॉलनी येथे एकमेव असा हा वृक्ष आढळून आला आहे.

The rarely fed trees found in Kolhapur, save, preserve and conserve them | कोल्हापुरात आढळली दुर्मीळ मेढशिंगी वृक्ष, जतन, संरक्षण आणि संवर्धन आवश्यक

कोल्हापुरात आढळली दुर्मीळ मेढशिंगी वृक्ष, जतन, संरक्षण आणि संवर्धन आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापुरात आढळली दुर्मीळ मेढशिंगी वृक्ष जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात एकमेव असणाऱ्या वृक्षांच्या यादीत आता ‘मेढशिंगी’ या वृक्षाची भर पडली आहे. निसर्ग व इतिहास अभ्यासक डॉ. मकरंद ऐतवडे यांना कोल्हापूर शहराच्या परिसरात पाडळकर कॉलनी येथे एकमेव असा हा वृक्ष आढळून आला आहे.

मेढशिंगी हा वृक्ष मूळचा भारतीय आणि बिग्नोनियेसी कुळातील असून संस्कृतमध्ये त्यास मेषाशृंगी, हिंदीमध्ये मेरशिंगी, कानडीत गुडमुर्की आणि वुडीगे, तर शास्त्रीय भाषेत डोलिकॅँड्रॉन फल्क्याटा असे म्हणतात. डोलिकॅँड्रॉन म्हणजे लांब, मोठे पुंकेसर असणारा आणि फल्क्याटा म्हणजे विळ्याच्या किंवा खुरप्याच्या आकाराच्या शेंगा येणारा होय.

मेढशिंगीचे वृक्ष ओसाड रानात, डोंगरउतारावर, पानगळीची व शुष्क वने, खडकाळ जमिनीवर आढळतात. खूप कमी वेगाने वाढणारा हा वृक्ष १० ते २० फुटांपर्यंत वाढतो. याचे खोड बहुधा वेडेवाकडे किंवा सरळ असून त्याचा रंग तपकिरी-चॉकलेटी असतो. साल खरखरीत आणि भेगाळलेली असते. पाने संयुक्त प्रकारची असून त्यात पाच ते सात पर्णिका असून, त्या असमान आणि गोलसर असतात.

डिसेंबरमध्ये पानगळती सुरू होते. मार्चमध्ये नवीन फांद्यांच्या टोकाला दोन-पाच फुलांचे फुलोरे लागतात. फुलाची लांबी पाच ते सात सें.मी. आणि व्यास साधारण ३ सें.मी. असतो. फुलाच्या खालच्या भागात पोपटी रंगाचे निदलपुंज असते. शेंगा परिपक्व होताना मेंढीच्या शिंगांसारख्या वक्र होतात.

शेंगा ३० ते ४० सें.मी. लांब वाढतात. शेंगांमध्ये अनेक बिया असून त्या चपट्या, आयताकृती आणि पंखधारी असतात. या वृक्षाची प्रा. एस. आर. यादव आणि डॉ. एम. एम. सरदेसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पतिकोशात नोंद आहे. जून महिन्यापर्यंत या वृक्षास फुले येतात. मेढशिंगीची फुले सायंकाळी उमलतात, असे डॉ. मकरंद ऐतवडे यांना त्यांच्या निरीक्षणात दिसून आले.


मेढशिंगी हा दुर्मीळ वृक्ष असून त्याचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. बियांपासून याची सहज लागवड करता येते. कोरड्या, निकृष्ट जमिनीत वनीकरणासाठी उपयुक्त असा हा वृक्ष आहे. सामाजिक वनीकरण आणि वन विभागाने मेढशिंगीच्या बियांपासून रोपे तयार करून वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्यावीत.
- डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे,
निसर्ग व इतिहास अभ्यासक, कोल्हापूर
 

 

Web Title: The rarely fed trees found in Kolhapur, save, preserve and conserve them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.