गौरव सांगावकर राधानगरी : संततधार पावसामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. जिल्ह्यात सद्या पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. उद्या, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने याठिकाणी पर्यटकांची पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी २० जुलै पासून अनिश्चित काळासाठी धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. मात्र, सद्या पावसाचा जोर कमी झाल्याने धबधबा आज, शनिवार पासून पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना पुन्हा एकदा वर्षा पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
दरम्यानच, राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा आज, पुन्हा खुला झाला आहे. स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा मधून १४२८ क्युसेक तर जलविद्युत केंद्रातून १४०० असा एकूण २ हजार ८२८ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. पर्यटकांना राऊतवाडी धबधबा तसेच स्वयंचलित दरवाजाचे मनमोहक दृश्य पाहता येणार आहे.