गोकुळच्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:17 AM2021-02-13T11:17:28+5:302021-02-13T11:33:16+5:30
Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरवासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतीवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे.
काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि.१५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरावासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतींवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. १२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, साधारणपणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
‘गोकुळ’साठी १५ डिसेंबर २०१९ रोजी संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. २२ जानेवारी २०२० अखेर ३,७६४ ठराव दाखल झाले होते. प्रत्यक्षात संस्थांपेक्षा १०५ ठराव जादा दाखल झाले होते. या दुबार ठरावांवर सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये सुनावणीदरम्यानच सात संस्थांमध्ये समझोता झाला होता.
उर्वरित ठिकाणी अध्यक्ष, सचिव एकीकडे, तर संचालक दुसरीकडे, असे चित्र होते, तर काही संस्थांमध्ये दोन सचिवांबरोबर दोन प्रोसेडिंग असल्याचे पेच निर्माण झाला होता. त्यावर सुनावणी होऊन ३,६५९ प्रतिनिधींचे नावे निश्चित केली होती. ही प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती, तोपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली.
आता नव्याने प्रक्रिया सुरू झाली असून, सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावांचा समावेशही या यादीत राहणार असून, दुबार ठरावांसह प्रारूप यादीवर येणाऱ्या हरकती घेता येणार आहेत.
तालुका दुबार ठराव संख्या
- आजरा ४
- करवीर १३
- कागल ७
- गगनबावडा १
- गडहिंग्लज ११
- पन्हाळा १७
- भुदरगड १८
- राधानगरी २७
- शाहूवाडी ४
- हातकणंगले १