सुवर्णमहोत्सवी निधीतील ३२ लाख मिळाले
By admin | Published: September 12, 2016 12:44 AM2016-09-12T00:44:13+5:302016-09-12T00:44:13+5:30
शिवाजी विद्यापीठ : आणखी १३ कोटींची मागणी; शासनाकडे ४० कोटींची बाकी
कोल्हापूर : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या सुवर्णमहोत्सवी निधीतील ३२ लाख रुपये शिवाजी विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. हा निधी स्कूल आॅफ नॅनो सायन्स अॅँड टेक्नॉलॉजीसाठी खर्च केला जाणार आहे. एकूण निधीपैकी आतापर्यंत विद्यापीठाला चार कोटी ११ लाख ९९ हजार रुपये मिळाले असून, अजून सुमारे ४० कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत.
संशोधनासह शैक्षणिक गुणवत्तेचा केंद्रबिंदू दक्षिण महाराष्ट्राकडे आणणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला सन २०११ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने ४५ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. या एकूण निधीपैकी गेल्या चार वर्षांत दोन कोटी ७९ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला मिळाले आहेत. निधी मिळेल या अपेक्षेने विद्यापीठाने स्वनिधीतून स्कूल आॅफ नॅनो सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी, यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंट, आदी उपक्रम सुरू केले. मात्र, प्रस्तावानुसार निधी मिळाला नसल्याने विद्यापीठाचे नावीन्यपूर्ण उपक्रम रखडले आहेत. भाजप-सेना सरकारकडून पूर्वीच्या मंजूर एकूण निधीपैकी सन २०१४-१५ साठी शासनाकडून विद्यापीठाला १३ कोटी ६९ लाख ६१ हजार रुपयांचा निधी मिळणार होता. मात्र, तो या वर्षामध्ये मिळाला नाही. सुवर्णमहोत्सवी निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, आॅगस्टअखेरीस विद्यापीठाला ३२ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामुळे एकूण सुवर्णमहोत्सवी निधीपैकी चार कोटी ११ लाख ९९ हजार रुपये विद्यापीठाला आत्तापर्यंत प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाने आणखी १३ कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव शासनाला गेल्या महिन्यात सादर केला आहे. यावर ४० लाखांच्या निधीसाठीचे पत्र आणि ते कोणत्या कारणासाठी खर्च केले जाणार आहेत, याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे. शासनाकडून मिळालेल्या ३२ लाख रुपयांचा निधी हा स्कूल आॅफ नॅनो सायन्स अॅँड टेक्नॉलॉजीसाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच ४० लाख रुपयांचा निधी मिळाल्यास तो म्युझियम कॉम्प्लेक्ससाठी खर्च केला जाणार आहे. प्रलंबित असलेला निधी मिळू लागल्याने सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये सुरू केलेल्या उपक्रमांच्या पूर्णत्वाला गती मिळणार आहे. दरम्यान, दि डिपार्टमेंट आॅफ सायन्स अॅँड टेक्नॉलॉजीतर्फे शिवाजी विद्यापीठाला प्रमोट युनिव्हर्सिटी रिचर्स फॉर सायंटिफिक एक्सलन्सअंतर्गत १० कोटी ९० लाख रुपये इतका निधी मिळाला आहे.
सातत्याने पाठपुरावा
४शासनाकडे निधी प्रलंबित असल्याने विद्यापीठाचे सुवर्णमहोत्सवी वर्षांतील उपक्रमांना आवश्यक त्या प्रमाणात गती मिळत नसल्याचे वास्तव आहे. हा निधी मिळविण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.
४ते म्हणाले, गेल्या १५ दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत या प्रलंबित निधीचा मुद्दा मांडला आहे. त्यांनी निधी देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. प्रलंबित निधीपैकी ३२ लाख रुपये विद्यापीठाला प्राप्त झाले असून, आणखी ४० लाख देण्याची कार्यवाही शासनाकडून सुरू आहे.