रिक्षाचालकाकडून साडेअकरा हजार रुपये प्रामाणिकपणे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 03:45 PM2019-03-22T15:45:58+5:302019-03-22T15:48:35+5:30
कोल्हापूर येथील हॉकी स्टेडियम परिसरात सापडलेले ११ हजार ७०० रुपये शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीसांकडे परत केले. अजित बापुसो ढेरे (वय ४९, रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर : येथील हॉकी स्टेडियम परिसरात सापडलेले ११ हजार ७०० रुपये शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीसांकडे परत केले. अजित बापुसो ढेरे (वय ४९, रा. म्हाडा कॉलनी, कोल्हापूर) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. यानिमित्त पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते ढेरे यांचा सत्कार करण्यात आला.
अजित ढेरे गेली तीस वर्ष प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय करतात. २० मार्चला दूपारी साडेचारच्या सुमारास पांढरे रंगाची पिशवी रस्त्यावर पडलेली मिळाली. त्यामध्ये ५०० व १०० रुपयांच्या नोटा असे पैसे दिसून आले. कोणाचीतरी पिशवी पडलेली असून चौकशीकरण्यासाठी येईल या भावनेने त्यांनी पैसे तीन दिवस आपलेजवळ ठेवले.
त्यांना पैशाची गरज असतानाही त्यांनी त्याला हात लावला नाही. त्यांनी सचिन पाडळकर, इम्रान मिस्त्री, अमोल जाधव, नंदु पाटील, काका कांबळे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जाधव यांची भेट घेवून त्यांचेकडे पैसे दिले.
त्यांनी पैशाच्या मालकाचा शोध घेतला असता ते अभिजित अनिल सासने (रा. संध्यामठ गल्ली, कोल्हापूर) यांचे असलेची खात्री झाली. त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून सन्मानपूर्वक पैसे परत केले. रिक्षा चालक ढेरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पोलीसांनी सत्कार केला. यावेळी सासने यांनी ढेरे यांना बक्षिस दिले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.