कोल्हापूर : सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी प्राधान्याने पूर्ण करावीत, त्याचबरोबर ५ नोव्हेंबरला त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, प्रियदर्शनी मोरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार अर्चना शेटे, आदींची होती.सर्व कार्यालयप्रमुखांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी. सर्व मतदारांचे एकत्र अर्ज कार्यालय प्रमुखाच्या पत्रासह संबंधित तहसीलदार, प्रांताधिकारी, गट विकास अधिकारी, महापालिका उपायुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करू शकतात.
या कामास कार्यालय प्रमुखांनी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर आपल्या कार्यालयात एकही पदवीधर मतदार नोंदणी करण्यास राहिला नसल्याबाबत ५ नोव्हेंबर रोजी प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.उपजिल्हा निवडणूक अधिकारी धुमाळ यांनी सुरुवातीला संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. यामध्ये कार्यालय प्रमुखांनी सेवापुस्तकांची साक्षांकित प्रत सोबत जोडावी, तसेच एकत्रित मतदार नोंदणीबाबत पत्र द्यावे.
बुधवार (दि. ६) ही मतदार नोंदणीची अंतिम तारीख आहे. ३१ आॅक्टोबर २०१६ पर्यंत प्राप्त पदवीधर यासाठी नोंदविला जाईल. त्याचबरोबर १ नोव्हेंबर २०१३ ते १ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत शिक्षक म्हणून तीन वर्षे सेवा केलेल्या शिक्षकाची शिक्षक मतदारसंघात नोंदणी करण्यात येईल, असे सांगितले.