कोल्हापूर : रेमडेसिविर इंजेक्शन्सचे उत्पादनच कमी होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात हजारांच्या संख्येने या इंजेक्शनची गरज असताना ती शेकड्यात उपलब्ध होत असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: हतबल झाले आहेत. ज्याला त्याला फोन करून विनंती करणाऱ्या नातेवाइकांचा संयम सुटत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पुरवठाच कमी होत असल्याने शासकीय यंत्रणेच्याही हातात काही राहिले नसून केवळ पाठपुरावा करण्याचे काम बाकी राहिले आहे.
कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला सहा इंजेक्शन्स द्यावे लागतात. त्यामुळे गेले दहा दिवस या इंजेक्शनसाठी अक्षरश: भीक मागण्याची वेळ आली असून, ती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक प्रचंड नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत खासगी रुग्णालयांमधून ४५०० रेमडेसिविरची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी केवळ ५०० इंजेक्शन्स उपलब्ध झाली आहेत. आता त्यातून ज्या ठिकाणी रुग्ण अगदीच गंभीर आहेत अशांसाठी प्राधान्याने पुरवठा करण्यात येणार आहे.
येणाऱ्या ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक दिवशी एक हजार रेमडेसिविरची इंजेक्शन्स लागणार आहेत. या महिनाअखेर शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी २८६०० रेमडेसिविर इंजेक्शन्सची गरज भासणार आहे; परंतु सर्वच भारतभर या इंजेक्शन्सची टंचाई भासू लागल्याने कंपन्यांनी उत्पादन वाढविले असले तरी ते अपुरे पडत आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा गट करण्यात आला आहे.
चौकट
पुणे, मुंबईहून फोन
माझा मित्र, नातेवाईक कोल्हापुरात रुग्णालयात दाखल आहे. कृपया यांच्यासाठी रेमडेसिविरची सोय करा, असे फोन पुण्या, मुंबईहून सुरू झाले आहेत.
चौकट
मिळेल त्या पैशांना खरेदी
जरी जिल्हाधिकाऱ्यांनी जादा रक्कम घेतल्यास कारवाईचा इशारा दिला असला तरी पाहिजे तर जादा पैसे घ्या; पण इंजेक्शन द्या, अशी विनवणी करताना नातेवाईक दिसत आहेत. त्यामुळेच १८५० रुपयांचे हे इंजेक्शन ६ हजार रुपयांनाही खरेदी केले जात आहे. कोल्हापूरकरांना बेळगावचाही आधार मिळत असून, तेथूनही मिळेल त्या रकमेला इंजेक्शन्स खरेदी केली जात आहेत.
चौकट
आम्ही नपुंसक आहोत
रेमडेसिविरच्या या प्रश्नावर जिल्हा परिषदेतील एका युवा माजी पदाधिकाऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना आम्ही नपुंसक आहोत असे आता मला वाटायला लागले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. समोरचा माणूस आपला आई-वडील, भाऊ, बहीण जगावेत यासाठी रेमडेसिविरची मागणी करतो आणि आपण त्याची ही मागणी पूर्ण करू शकत नाही याची आता लाज वाटायला लागली आहे, अशा भाषेत या पदाधिकाऱ्याने आपली उद्विग्नता व्यक्त केली.