कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण साऱ्या जिल्ह्यात पसरेल, असा इशारा देत संबंधित ग्रामपंचायतींची तक्रारी नसल्याने वाद संपवा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार प्रदूषण मंडळाने कारखाना बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे हसन मुश्रीफ यांना समजताच, १५ मिनिटांत ते कार्यालयात दाखल झाले. त्यांनी विभागीय अधिकारी नागेश लोहळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. घोरपडे कारखान्यातून एक थेंबही स्पेंटवॉश बाहेर जात नाही, तीन-चार दिवसांपूर्वी जी घटना घडली, त्याची वस्तूस्थिती वेगळी आहे.
ऊसदर आंदोलनामुळे कारखाना बंद होता, आमच्या चारही ‘ए. टी. पी.’ आॅपरेटर हे बेलेवाडी काळम्मा गावातीलच आहेत. चिकोत्रा नदीत पाणी नसल्याने पाण्यासाठी खड्डे काढले होते, पाणी सोडल्यानंतर गाळ आणि इतर घाण जॅकवेलमध्ये गेल्याने पाणी घाण झाले असावे.
तरीही आमच्या कारखान्याबाबत काही त्रुटी असतील, तर प्रदूषण मंडळाने त्या निदर्शनास आणून द्याव्यात, त्याची पूर्तता केली जाईल. आज कोणी बाटली घेऊन आले असेल, तर उद्या आम्ही घागर घेऊन येऊ. जाणीवपूर्वक कारवाई कराल, तर दारात उपोषणाला बसू, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.‘शाहू’ कडे सकारात्मक बघितलेगेली ४० वर्षे ‘शाहू’ कारखान्याचे दूषित पाणी व काजळीने कागल शहर व परिसरातील जनता त्रस्त आहे; पण त्याबद्दल आम्ही कधी तक्रार केली नाही, सकारात्मक दृष्टीनेच बघितल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
कारवाई नव्हे कारणे दाखवा नोटीसप्रदूषण मंडळाच्या या कार्यालयाला कारखाना बंद करण्याचे अधिकार नाहीत. पहिल्यांदा कारणे दाखवा नोटीस द्यायची असते, आमच्या खुलाशानंतर तो योग्य नसेल, तर मंडळ पुढील कारवाई करू शकते. असे मुश्रीफ यांनी सांगितले.
बेलेवाडी काळम्मा, बाचणीला नवीन पाणी पुरवठाजिल्ह्यातील जनतेची सेवा प्रामाणिकपणे केली आहे, त्यांना त्रास व मन:स्ताप होणार नाही, याची प्राणपनाने दक्षता घेणे माझे कर्तव्य आहे; त्यामुळे बेलेवाडी काळम्मा, बाचणी या गावातील जनतेची मागणी असेल, तर दोन्ही गावांत नवीन पाणी पुरवठा योजना करून देण्यास तयार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.