‘सारथी’च्या रचनेबाबतचा अहवाल डिसेंबरअखेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:06 AM2017-11-20T01:06:19+5:302017-11-20T01:06:24+5:30
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी) रचनेबाबतचा अहवाल डिसेंबर २०१७ अखेर सादर करण्यात येणार आहे. याबाबत कृषी, उद्योग, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती हा अहवाल सादर करणार आहे.
महाराष्ट्रामध्ये गतवर्षी मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले होते. त्याची दखल घेत मराठा, कुणबी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या बहुजन समाजाच्या युवक-युवतींसाठी एका संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे जाहीर केला होता. ‘बार्टी’संस्थेच्या माध्यमातून दलित युवक, युवती, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच धर्तीवर ही संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
त्यानंतरदि. ३ जानेवारी २०१७ रोजी शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आदेश काढून या संस्थेचे स्वरूप कसे असावे, याबाबत मार्गदर्शन व शिफारस करण्यासाठी द्विसदस्यीय समितीची स्थापना केली होती. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे यांची समितीच्या अध्यक्षपदी, तर डी. आर. परिहार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सेनापती बापट रोडवरील ‘बालचित्रवाणी’चे कार्यालय या संस्थेसाठी देण्यात आले आहे. या समितीला आॅक्टोबर २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, आता ती पुन्हा वाढवण्यात आली असून डिसेंबरअखेर करण्यात आली आहे. त्यानुसार बहुजन समाजाचे कृषी, शिक्षण, सामाजिक, औद्योगिक, आर्थिक असे जे प्रश्न आहेत, त्यांचा सर्वंकष अभ्यास करून ते सोडविण्यासाठी ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून काय करता येईल
याबाबत ही समिती शिफारशी करणार आहे.