कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडेच देण्यात यावा, असा आदेश काल, शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाला आहे. आज, शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी कार्यभार स्वीकारला. अंबाबाईच्या नवरात्रौत्सव नियोजनाच्या पार्श्वभूमीवर हे पद पूर्वीचे निवासी उपजिल्हाधिकारी आणि आताचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संजय पवार यांच्याकडेच ठेवले होते. संजय पवार यांची काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर बदली झाली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी देवस्थान समितीच्या सचिवपदाचा कार्यभार सांभाळलेला होता. ऐन नवरात्राच्या तोंडावर त्यांची बदली झाली. नवीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना अजून मंदिराची माहिती असणार नाही, या तांत्रिक कारणात्सव नवरात्रौत्सव संपेपर्यंत सचिवपदाचा कार्यभार पवार यांच्याकडेच राहावा, असे मत जिल्हाधिकारी आणि देवस्थानचे अध्यक्ष राजाराम माने यांचे होते. तसा प्रस्तावही त्यांनी शासनाला पाठविला होता. दरम्यान, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी, देवस्थानचे सचिवपद निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे असताना या पदावर अन्य व्यक्ती काम करू शकत नाही, अशी तक्रार शासनाकडे केली. त्यानंतर काल, शुक्रवारी संध्याकाळी शासनाच्या विधी व न्याय खात्याने देवस्थानचे सचिवपद निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडेच असावे, असे नमूद केले. (प्रतिनिधी)
देवस्थान सचिवपदाचा कार्यभार निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडेच
By admin | Published: September 28, 2014 12:54 AM