आमचे दागिने परत द्या, अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:29 AM2021-08-12T04:29:36+5:302021-08-12T04:29:36+5:30
कोल्हापूर : चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले, पण न्यायालयाचा आदेश होऊनही ते मूळ मालकाला परत दिले नाहीत, हे दागिने ...
कोल्हापूर : चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले, पण न्यायालयाचा आदेश होऊनही ते मूळ मालकाला परत दिले नाहीत, हे दागिने पूर्ववत परत मिळावेत, अन्यथा दि. १५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मूळ मालक निवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक येणेचवंडीकर यांनी दिला. त्याबाबतचे निवेदन त्यांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले.
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक येणेचवंडीकर यांची मुलगी पुष्पलता ठबे (रा. चिचवड, पुणे) ह्या कोल्हापूरला आल्या असता पाचगाव येथे अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे गंठण लांबवले होते. चोरटा पकडला, चोरलेले गंठणही पोलिसांनी जप्त केले, त्या गंठणची ओळखपरेडही झाली. त्यानंतर ठबे पुण्याला निघून गेल्याने त्यांनी सर्व अधिकार वडील येणेचवंडीकर यांच्याकडे दिले. त्यानंतर संबंधित जप्त दागिना यणेचवंडीकर यांना परत देण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले, पण तो मुद्देमाल देण्यास गेली दीड वर्षे पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. संबंधित सोन्याचा दागिना परत मिळावा. कोणी कर्मचाऱ्यांनी अगर अधिकाऱ्यांनी त्याबाबत अफरातफर केली असल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. याबाबत दि. १४ ऑगस्टपर्यंत न्याय न मिळाल्यास दि. १५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा अशोक येणेचवंडीकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
‘लोकमत’चा पाठपुरावा
दरम्यान, निवृत्त उपनिरीक्षकाची दागिन्यासाठी फरपट या मथळ्याखाली ‘लोकमत’ने याचा मे महिन्यात पाठपुरावा केला. न्यायालयाने आदेश देऊनही पोलीस खात्यातील सेवानिवृत्त उपनिरीक्षकाची स्वत:चे दागिने मिळवण्यासाठी अशी फरपट होत असेल तर सामान्य माणसांना कसा न्याय मिळणार याबाबत वाचा फोडली होती.