कोगनोळी : कर्नाटक राज्य शासनाने यापूर्वीच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना राज्यातील प्रवेशास बंदी घातली आहे. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १० मे ते २४ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांनाच राज्यातील प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आंतरराज्य सीमा असणाऱ्या कोगनोळी या ठिकाणाहून कर्नाटकात प्रवेश करू इच्छिणारी अनेक वाहने परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहेत.
कोगनोळी येथील नाक्यावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चार चाकी प्रवासी वाहनांबरोबरच मोटरसायकल व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही थांबवून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कर्नाटकात अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी कर्नाटकातील अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र तसेच महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना कर्नाटकातील रहिवासाबाबतचे ओळखपत्र असल्याशिवाय राज्यात प्रवेशास मज्जाव करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांना चकवा देऊन आंतरराज्य प्रवास करणाऱ्या नागरिकांना चाप बसत आहे. अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तींवर ही वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या नाक्यावर सुमारे २५ पोलीस व होमगार्डसचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
१० कोगनोळी
फोटो ओळ : कर्नाटक सीमेवरून परत महाराष्ट्रात पाठविण्यात येणारी वाहने महामार्गाच्या बाजूला थांबू नयेत म्हणून तेथे दगडे ठेवण्यात आली होती.
छाया : बाबासो हळीज्वाळे.