गॅस सिलिंडर दरवाढ मागे घ्या; अनुदान सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:29 AM2021-09-04T04:29:09+5:302021-09-04T04:29:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या खाईत गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून केंद्र शासनाने तेल ओतले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या खाईत गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून केंद्र शासनाने तेल ओतले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील बनत आहे. ही दरवाढ ताबडतोब मागे घ्या आणि पूर्वीप्रमाणे अनुदान सुरू करावे, या मागणीसाठी येथील शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरवर्षी महागाई वाढत चालली आहे. मागील काही महिन्यांपासून इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक असलेल्या घरगुती गॅस सिलिंडर दरात सातत्याने वाढ होत चालली आहे. त्यामुळे सुरुवातीला ४०० रुपयांत मिळणारा अनुदानित गॅस सिलिंडर आता ८०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. आठ महिन्यांत १९१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर येथील कॉँग्रेस समितीने मलाबादे चौकात चूल मांडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्र शासनाच्या कारभाराबाबत टीका करून निषेध व्यक्त करण्यात आला.
आधीच कोरोना लॉकडाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. उद्योग-व्यवसाय बंद स्थितीत आहेत. त्यातच या महागाईमुळे जगणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे ताबडतोब ही दरवाढ रद्द करून अनुदान सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहर अध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक राहुल खंजिरे, महिला अध्यक्षा मीना बेडगे, राजू आवळे, बाबासाहेब कोतवाल, राजन मुठाणे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
फोटो ओळी
०३०९२०२१-आयसीएच-०७
गॅस सिलिंडर दरवाढ मागे घ्या व अनुदान सुरू करण्याच्या मागणीसाठी इचलकरंजीत कॉँग्रेसने निदर्शने करून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.
छाया-उत्तम पाटील