गडहिंग्लजला महालक्ष्मी यात्रेचा आढावा
By Admin | Published: March 31, 2015 11:27 PM2015-03-31T23:27:44+5:302015-04-01T00:01:12+5:30
डिजीटलमुक्त यात्रेचा निर्धार : शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार
गडहिंग्लज : येथील श्री महालक्ष्मीची १५ वर्षांनी होणारी यात्रा सुरळीत पार पाडावी यासाठी यापुढे दर शुक्रवारी तयारीच्या आढाव्याची बैठक घेतली जाईल. संबंधितांनी कर्तव्यभावनेने बैठकीला उपस्थित रहावे, अशी सूचना तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली.मेमध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा समिती व प्रशासनाची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी तहसीलदार पाटील होते. यात्रा डिजीटलमुक्त करण्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
यात्रा कालावधीत महिलांसाठी १३०, तर पुरुषांसाठी ११९ शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून, अन्य ठिकाणांहून काही मोबाईल टॉयलेट मागविले जाणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी दिली.यात्रेपूर्वी १५ दिवस आधी शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली जाईल. त्यासाठी बाहेरून शंभर कर्मचारी मागविण्यात आले आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक रमेश मुन्ने यांनी दिली. पाणीपुरवठ्यासाठीही पर्यायी कर्मचारी तैनात ठेवण्याची सूचना तहसीलदारांनी दिली.प्राथमिक आरोग्य केंद्राकडील तालुक्यातील रुग्णवाहिका यात्रा कालावधीत गडंिहंग्लजमध्ये उपलब्ध ठेवण्याबरोबरच आवश्यक औषधांचा साठा ठेवण्याचे आदेश तहसीलदारांनी आरोग्य खात्याला दिला.शहरातील सर्व तरुण मंडळे व नागरिकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. यात्रा डिजीटलमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी केली. यात्रा काळातील सुरक्षेबाबतच्या उपाय योजनांची माहिती पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली.
चर्चेत नगराध्यक्ष लक्ष्मी घुगरे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, यात्रा समिती उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, बसवराज आजरी, राजेंद्र तारळे, आण्णासाहेब देवगोंडा, बाळासाहेब गुरव, सुरेश कोळकी, अनंत पाटील, प्रा. अनिल कुराडे, पवन तोरगल्ली, आदींनी भाग घेतला. आगार व्यवस्थापक सुनील जाधव, उत्पादन शुल्क विभागाचे पी. ए. मुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)