आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २0 : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासाचा आढावा गुरुवारी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभागाने (सीआयडी) कोल्हापुरातील शनिवार पेठेतील कार्यालयात दिवसभर घेतला. यासाठी या विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम आले आहेत. तपास अधिकारी तथा सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे देऊन या गुन्ह्याची संपूर्ण माहिती कदम यांना दिली.वारणानगर येथील संकुलात असलेल्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संगनमत करून सुमारे नऊ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविला. या प्रकरणी तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह सातजणांना निलंबित केले आहे. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने याचा तपास राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी राज्य गुन्हे अन्वेषण पुणे विभाग (सीआयडी) यांच्याकडे वर्ग केला. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रव्यवहार केला. त्यानुसार गुरुवारी सकाळी सीआयडी पुणे विभागाचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्यासह कोल्हापूरचे सहायक पोलिस अधीक्षक तथा तपास अधिकारी हर्ष पोद्दार शनिवार पेठेतील ‘सीआयडी’च्या कार्यालयात आले. त्यांनी वारणानगर येथे सांगली पोलिसांनी मारलेल्या डल्ल्याच्या माहितीसह आजपर्यंतच्या एकूण तपासाची माहिती दिली. तसेच कदम यांच्याबरोबर चर्चा केली. मात्र, या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. यावेळी कोल्हापूर (सीआयडी)चे पोलिस अधीक्षक आर. आर. बनसोडे उपस्थित होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ‘सीआयडी’चे पथक वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत गेले असल्याचे समजते.कदम कोल्हापुरात तळ ठोकूनवारणानगर येथील या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. त्याचबरोबर या प्रकरणात तपासाच्या दृष्टीने आणखी काही धागेदोरे काय मिळतात काय; तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सीआयडी करणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम त्याची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगण्यात आले.
वारणानगर लुटीचा ‘सीआयडी’कडून आढावा
By admin | Published: April 20, 2017 6:05 PM