सुधारित : आचार्य शांतिसागर महाराजांवर मंगळवारपासून राष्ट्रीय चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:26 AM2020-12-06T04:26:27+5:302020-12-06T04:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर महाराज यांच्या दीक्षा शताब्दीनिमित्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मानवतेचे पुजारी म्हणून ओळख असलेले विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतिसागर महाराज यांच्या दीक्षा शताब्दीनिमित्त कोल्हापुरात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रातर्फे येत्या मंगळवारी (दि. ८) व बुधवारी (दि. ९) दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये शांतिसागर महाराजांच्या विचारांचा जागर होणार आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर अध्यासन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. विजय ककडे, समितीचे प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, संजय शेटे, सुरेश रोटे, संदीप पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत त्याची घोषणा केली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या परिषदेत डॉ. डी. ए. पाटील लिखित ‘शांतिसागर चरित्र’ व भारती उपाध्ये लिखित ‘आत्मसंस्कार’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. परिषदेचा समारोप खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आचार्य शांतिसागर महाराजांनी मार्च १९२० मध्ये बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे परमपूज्य देवेंद्र कीर्ती महाराज यांच्याकडून निग्रंथ मुनिदीक्षा घेतली. त्याला या वर्षी १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने शताब्दी समिती स्थापन करून देशभर विविध सभा, समारंभ, विधी, विधाने, चरित्रनिर्मिती, ग्रंथनिर्मिती, यरनाळ येथे समाजोपयोगी प्रकल्प साकारले आहेत. विविध विद्यापीठे, शाळा, कॉलेजांमध्ये शांतिसागर महाराजांचे जीवनकार्य व्याख्यानांच्या माध्यमातून पोहोचविले जात आहे.
चौकट ०१
८ डिसेंबर : उद्घाटन, नऊ वक्त्यांची भाषणे, काव्यसंमेलन : अध्यक्षस्थान : शाहीर कुंतीनाथ करके
९ डिसेंबर : लठ्ठे फौंडेशन उद्घाटन व समारोप : अध्यक्षस्थान - रावसाहेब पाटील.