कोल्हापूर : महापूर आणि बंद असलेल्या वाहतूक मार्गाचा गैरफायदा घेत भाजीपाल्याच्या केलेल्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा मंगळवारी वाहतूक सुरू झाल्यानंतर संपुष्टात आला आणि चार दिवसांपासून कडाडलेल्या भाजीपाल्याचे दर मागील आठवड्यासारखे पूर्ववत झाले. डाळी, कडधान्याचीही आवक सुरू झाल्याने दरही स्थिर आहेत. दरम्यान, भाजीपाल्याचे आगर असलेल्या शिरोळ, करवीर तालुक्यातून महापुरामुळे आवक कमी झाल्याने कर्नाटकातील भाजीपाल्यावर कोल्हापूरकरांची भूक भागत आहे.आपत्तीतही लाभ उठवण्याची प्रवृत्ती यावेळच्या महापुरातही दिसली. महापुरामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाल्याने लगेच दरात चारपटीने वाढ झाली. त्यामुळे शनिवार आणि रविवारी कोल्हापूर शहरात कोथिंबिरीची एक पेंडी शंभर रुपयांवर, मिरची शंभर रुपयांवर, तर वांगी दोनशे रुपये किलोवर गेली होती. टोमॅटोही १५० रुपये किलो दराने विकले जात होते. पण सुदैवाने सोमवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली.
महापुराचे पाणीही ओसरू लागल्याने प्रमुख मार्गही वाहतुकीसाठी खुले होऊ लागले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के खुला झाल्याने चार दिवसांपासून अडकलेली सर्व वाहने मार्गस्थ झाली. परिणामी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांत भाजीपाल्याचा पुरवठा वाढला. आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या कृत्रिम दरवाढीचा फुगवटा कमी झाला असून, दर मागील आठवड्याप्रमाणे पूर्ववत झाले. त्यामुळे बाजारात ग्राहकांकडून मनसोक्त खरेदी झाली. दिवसभर बाजारात भाजीच्या खरेदीसाठी गर्दी कायम होती.वांग्यांना चढला भावसर्व भाजीपाल्याचे अचानक वाढलेले दर कमी झाले असताना, वांग्यांनी मात्र चांगलाच भाव खाल्ला आहे. ३० ते ४० रुपयांना पावकिलो असा वांग्याचा दर आहे. भरताचे वांगेदेखील २० रुपयांना एक असे विकले जात आहे. पांढरी वांगी किलोला सव्वाशे ते दीडशेवर गेल्याने काळ्या वांग्यांना मागणी वाढली आहे, पण त्याचेही दर १०० रुपयांच्या घरातच असल्याने वांगी सर्वसामान्यांच्या परवडण्याच्या पलीकडे गेली आहेत.प्रमुख भाजीपाल्याचे दर असे (किलोमध्ये)
- वांगी १२० ते १४०
- टोमॅटो २५ ते ३०
- भेंडी ७० ते ८०
- ढबू ४० ते ५०
- घेवडा ८० ते १००
- बिन्स १२०
- वरणा ७० त ८०
- कांदा १५ ते २५
- बटाटा २० ते २५
- पेंडीचे दर असे
- मेथी १० ते १५
- शेपू १०
- पोकळा १०
- कांदापात १० ते १५
- शेवगा १० ते २०
- कोथिंबीर २० ते २५
डाळी कडधान्ये (किलोमध्ये)
- तूरडाळ: १००
- मूगडाळ: १२०
- उडीद डाळ: १२०
- चवळी: ९०
- हिरवा मूग: १००
- हिरवा वाटाणा: ९०
- मटकी: १२०
- मसुरा ९०
- मसूर डाळ ९०
- हरभरा डाळ ७८
- ज्वारी ३० ते ५८
- गहू ३० ते ३५
- बाजरी ३०
- नाचणा ४०