कसबा बावडा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सारे तुमच्या पाठीशी एक दिलाने आहोत असा आग्रह शुक्रवारी शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी धरला... निमित्त होतं ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचं... सायंकाळी अजिंक्यतारा येथे झालेल्या या समारंभात तरूण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते... यानिमित्त ऋतुराज यांनी विधानसभेचे रणशिंगच फुंकले...
युवा नेते ऋतुराज संजय पाटील यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांची जंगी उपस्थिती अशा माहोलात संपन्न झाला. शहरभर ‘आपलं ठरलंय’ या टॅगलाईनने चर्चेत असलेला हा वाढदिवस आज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करणारा राहिला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज सायंकाळपासून अजिंक्यतारा या आम. सतेज पाटील यांच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रिघ लागली होती. यामध्ये युवा कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा वर्गाचे एक आश्वासक नेतृत्व म्हणून ऋतुराज पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
त्यांनी युवा वर्गामध्ये मितभाषी स्वभावामुळे आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्यामुळे त्यांना सर्वच पक्षातून सध्या मागणी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची सुद्धा त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी तीव्र इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आज शुभेच्छा देत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या निवडणुक लढवावी याबाबतच्या आपल्या भावनाच व्यक्त केल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहरात उभे राहिलेले कार्यकर्त्यांचे शुभेच्छा फलक आणि आपलं ठरलंय ही टॅगलाईन यामुळे सर्वांना त्यांच्याकडून मोठ्या आशा आहेत. ते कोणता निर्णय घेतात याबाबत येणारा काळच ठरवेल.दरम्यान आज सकाळी कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानी आजी शांतादेवी डी पाटील, काका सतेज पाटील, प्रतिमा पाटील, सौ. राजश्री काकडे, पूजादेवी ऋतुराज पाटील यांनी त्यांचे औक्षण करून केक कापण्यात आला.
वाढदिवसानिमित्त आज त्यांना बिद्री कारखान्याचे संचालक विजयसिंह मोरे, खासदार संजय मंडलिक यांचे ज्येष्ठ चिरंजीव विरेंद्र मंडलिक यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, रोहित पवार, विश्वजित कदम, माजी आमदार व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, पार्थ पोवार यांनी ऋतुराज पाटील यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. त्याच बरोबर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी ही गर्दी कायम होती.