शिरोळमध्ये नदी वाचवा अभियान
By admin | Published: September 22, 2015 11:29 PM2015-09-22T23:29:10+5:302015-09-22T23:50:20+5:30
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : ५००० गणेशमूर्ती आणि पंधरा ट्रॉली निर्माल्य दान
जयसिंगपूर / कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात नदी प्रदूषण टाळ्यासाठी निर्माल्य व मूर्तिदान आवाहनास गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण, शिरोळसह परिसरामध्ये गणेश मूर्ती नदीत विसर्जित न करता दान करून नदी प्रदूषणाबाबत जागृती निर्माण झाल्याची जाणीव तालुक्यात दिसून येत आहे.
जयसिंगपूर शहरात हजारो गणेशमूर्ती प्रत्येकवर्षी पंचगंगा आणि कृष्णा नदीपात्रात विसर्जित करण्यात येतात. निर्माल्यही नदीतच सोडण्यात येते. यामुळे नदी प्रदूषण होऊन पाण्यातील जीवसृष्टीस धोका निर्माण होतो. याची दखल घेऊन यावर्षी उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा घाटावर उदगाव टेक्निकल हायस्कूल, ड्रीम इंडिया फौंडेशन व ग्रामपंचायतीने निर्माल्य व गणेश मूर्तिदान करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मूर्तिदान केल्या. याठिकाणी दोन हजारांहून अधिक मूर्त्या जमा झाल्या होत्या. तर आठ ट्रॉल्या निर्माल्य जमा झाले होेते. जमा झालेल्या गणेशमूर्ती वापरात नसलेल्या विहिरीत विसर्जित केल्या. तर निर्माल्य हायस्कूलमध्ये त्याची खत निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडले व शंकर केंदुले यांनी येथे येऊन उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच प्रकाश बंडगर, ग्रामविकास अधिकारी संजय बंडगर सर्व कर्मचारी व फौंडेशनचे कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. शिरोळमध्ये श्री दत्त साखर कारखाना व ग्रामपंचायतीच्यावतीने पंचगंगा घाटावर १६०० गणेशमूर्ती जमा झाल्या, तर चार ट्रॉल्या निर्माल्य गोळा झाले होते.
कुरुंदवाडमध्ये नगरपालिका व एस. पी. हायस्कूल यांच्यावतीने नदी प्रदूषण रोखण्यासाठी शिरोळ-कुरुंदवाड दरम्यानच्या अनवडी पुलावर विसर्जन कुंड व निर्माल्य टाकण्यासाठी ट्रॉलीची व्यवस्था केली होती. सुमारे सहाशे मूर्त्या याठिकाणी जमा झाल्या होत्या. शिरढोण (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गणेशमूर्ती व निर्माल्यदान उपक्रमाला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. याठिकाणी सुमारे सातशे गणेशमूर्ती दान स्वरूपात मिळाल्या. ग्रामपंचायतीने प्रथमच ही मोहीम राबविल्याने ग्रामस्थांतून चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हा परिषदेमार्फत पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एम. एम. यादव, तालुका पंचायतीचे विस्तार अधिकारी एम. आर. कोळी यांनी भेट दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी आरकाटे, मधुकर सासणे, राजेखाण नदाफ, विश्वास बालिघाटे, विलास चौगुले, रावसो बिरोजे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)