रस्ता केला वाढून पिके गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:03+5:302021-07-29T04:24:03+5:30

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना ...

The road grew and carried crops | रस्ता केला वाढून पिके गेली वाहून

रस्ता केला वाढून पिके गेली वाहून

Next

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत भादोले ते शिगाव दरम्यान रस्त्याचे काम यंदा पूर्ण झाले. हे काम करताना रस्त्याची उंची पाच फुटांनी वाढविल्याने, तसेच केवळ दोन ठिकाणी पाणी जाण्यासाठी चार फुटांचा एक नळा ठेवल्याने महापुराचे पाणी तुंबून भादोले, शिगाव, किणी, कोरेगाव येथील तब्बल चार हजार एकर शेती अद्याप पाण्याखाली आहे. हा नवा रस्ता शेतकऱ्यांसाठी काळ ठरला असून, पूरबाधित भागात रस्त्याची उंची वाढविलीच का, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी करीत आहेत.

यंदाच्या महापुराने नदीकाठच्या पिकांचा चिखल झाल्याने अगोदरच कोरोनामुळे हवालदिल झालेला शेतकरी पुरता हरला आहे. वारणा नदीकाठची पिके २३ जुलैपासून पाण्यात असल्याने, तसेच २०१९ पेक्षा पुराचे पाणी एक किलोमीटर जास्त आत शिरल्याने शेतकऱ्याच्या भरल्या संसाराची राखरांगोळी झाली असल्याचे चित्र आहे. वारणाकाठ हा कसदार पट्टा, तसेच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु, यंदाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १५१ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण केले. भादोले ते शिगाव हा पूर पट्टा असल्याने येथे रस्त्याची उंची न वाढविता केवळ रस्ता करणे अपेक्षित होते. तसेच रस्त्याच्या पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे जाण्यासाठी चार ते पाच ठिकाणी मोठी माेरी बांधणे आवश्यक होते. परंतु, हा रस्ता पाच फुटांनी वाढविण्यात आला. तसेच केवळ दोन ठिकाणी मोरी बांधून तेथे केवळ एक चार फुटी सिंमेंटचा नळा टाकून पाच किलोमीटरचे महापुराचे पाणी घालविण्याचा भीम पराक्रम केला आहे. यामुळे यंदा वारणाकाठच्या शेतीला मरणकळा आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या रस्त्यामुळे सर्वांत जास्त फटका भादोलेला बसला असून, येथील जवळपास दोन हजार एकर शेती पाण्याखाली आहे. सांगली जिल्ह्यातील शिगाव गाव ८० टक्के स्थलांतर केले असून, ७० टक्केे जमीन पाण्यात गेली आहे, तर कोरेगाव येथे पुराचे अडीच किलोमीटर पाणी आले असून, ८०० एकरांतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच किणी येथील पूरपातळी २०१९ पेक्षा वाढून ५०० एकर शेती बुडाली आहे.

.........

त्या अभियंत्याला नोबेलच द्यायला हवे

शिगाव ते भादोले अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या अंंतरात पाणी रस्ता पास करण्यासाठी तीन ते चार ठिकाणी मोठ्या मोऱ्या बांधणे अपेक्षित होते. परंतु, केवळ दोन ठिकाणी केवळ एक नळा टाकून पाणी जाण्याचे नियोजन करणाऱ्या सार्वजिनक बांधकामच्या अधिकाऱ्यास नोबेलच द्यायला हवा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

........

मंत्री गाडीतून उतरलेही नाहीत

दोनच दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील या रस्त्यावरून जात असताना येथील शेतकऱ्यांनी त्यांचा तापा अडवून रस्त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच मोरी लहान असल्याने पाणी जात नसल्याचे सांगून मोरी पाहण्याची विनंती केली. परंतु, मी लक्ष घालतो असे सांगून त्यांनी गाडीतून उतरण्याची तसदीही घेतली नाही. तसेच या भागातील एकही लाेकप्रतिनिधी या भागाकडे फिरकलेला नाही. यावरही शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत.

.....

कोट....

जिल्ह्यातील तीन मंत्री असूनही ते आपल्या मतदारसंघापुरतेच पूरस्थिती पाहत बसले आहेत. भादोले ते शिगाव पाणी तुंबूंन शेती बुडाली आहे; पण आमदार, खासदार इकडे फिरकलेला नाही, हा प्रश्न लवकर सोडवला नाही तर शेतकरी मंत्र्यांच्या गाड्या फोडतील.

शिवाजी माने, अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना.

.........

भादोले ते शिगाव रस्ता उंच केल्याने शिगावमध्ये ८५० फूट पाणी आत आले आहे. २०१९ मध्ये ३० टक्के गाव उठले होते. यंदा ८० टक्के गाव स्थलांतर झाले आहे. तसेच ७० टक्के शेती पाण्याखाली आहे. रस्ता वाढल्याने आमचे वाटोळे झाले आहे.

निवास पाटील, शेतकरी शिगाव

.........

हा रस्ता करीत असताना आम्ही तीन ठिकाणी मोरी बांधण्याचा प्रयत्न केला, पण तेथील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने जागा बदलावी लागली. तसेच येथे नाले नसल्याने पाणी जास्त वेळ साठून राहत आहे. जर तशी मागणी केली तर आणखी दोन ठिकाणी मोरी बांधण्यास आम्ही तयार आहोत.

जी. आर. टेपाळे, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: The road grew and carried crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.