पुराच्या पाण्याने कुंभी धरणाशेजारील रस्ता तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:52+5:302021-06-21T04:16:52+5:30
सांगरूळ : कुंभी धरणाच्या पश्चिमेकडे सांगरूळ ते कुडित्रे वळण रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने दोन झाडे रस्त्यावरच कोसळली ...
सांगरूळ : कुंभी धरणाच्या पश्चिमेकडे सांगरूळ ते कुडित्रे वळण रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने दोन झाडे रस्त्यावरच कोसळली आहेत. तातडीने येथे उपाययोजना केली नाही, तर संपूर्ण रस्ता वाहून जाण्याचा धोका आहे.
सांगरूळ ते कुडित्रे मुख्य रस्त्यावरील कुंभी नदीवरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजूच्या मोठ्या वळणाजवळ रस्ता व बाजूच्या शेतीमध्ये पंधरा ते वीस फूट दरी आहे. रस्ताही रुंद असल्याने आठ ते दहा फुटांच्या साइडपट्ट्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने २० ते २५ फुटांपर्यंतची साइडपट्टी पूर्णपणे कोसळल्याने रस्ता तुटत चालला आहे. या ठिकाणी असणारी दोन मोठी झाडे कोसळली आहेत. मोठ्या वाहनांना याचा अडथळा होत आहे, तर तुटलेल्या ठिकाणापासून ४० ते ५० फूट लांब मोठी भेग पडली असून याठिकाणीही साइडपट्टी तुटण्याची शक्यता आहे. या रस्त्यापासून नदीचे अंतर खूपच कमी आहे. नदीला पूर आल्यानंतर पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. तातडीने उपाययोजना न केल्यास पुरात हा रस्ता नाहीसा होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तातडीने मुरूम टाकून दगडी पिचिंग करणे गरजेचे आहे.
दरम्यान, सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच सुशांत नाळे, कर्मचारी सागर नाळे, सुनील पाटील, सागर खडके यांनी तातडीने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
फोटो ओळी :
१) सांगरूळ ते कुडित्रे मार्गावर कुंभी नदी धरण वळणावर पुराच्या पाण्याने रस्ता तुटू लागला आहे. (फोटो-२००६२०२१-कोल-सांगरुळ)
२) रस्ता तुटल्याने दोन डेरेदार वृक्ष कोसळली आहेत, ती बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. (फोटो-२००६२०२१-कोल-सांगरुळ०१)