पन्हाळा : चालत ये-जा करण्यासाठी पन्हाळ्याचा रस्ता गुरुवारपासुन लोखंडी बॅरिकेड्स लावुन खुला करण्यात आला असुन येत्या दोन दिवसात फक्त दुचाकीसाठी हा रस्ता खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी आभियंता संजय काटकर यांनी दिली.अतिवृष्टीमुळे २३ जुलै रोजी पन्हाळ्यावर येणारा रस्ता खचला. यामुळे वाहतूक थांबली होती. आज गुरुवारी सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी खचलेल्या या भागाचे सर्वेक्षण केले. यावेळी हा खचलेला भाग सुमारे पन्नास फुट खोल आणि दोनशे फुट लांब असल्याचे आढळुन आले. पडलेल्या चार दरवाजाच्या तटभिंतीवर हा रस्ता बांधला गेला असल्याने या भिंती आणि त्याचे दगड कमकुवत झालेले आढळुन आले आहेत. हे दगड बाजुला करण्यास पुरातत्व विभाग परवानगी देणार का आणि दुरुस्तीचे काम करु देणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम नेमके कधी सुरु होइल हे सांगता येत नाही.दरम्यान, या खचलेल्या रस्त्याचे काम सुरु होण्यास अजून दोन महिने जाण्याची शक्यता आहे. यासाठी भूगर्भ चाचणीचा अहवाल आणि पडत असलेला पाऊस या कारणाने विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय तयार होणारा रस्ता स्लॅपड्रेन पद्धतीचा होणार आहे. यासाठी अंदाजे खर्च सहा कोटी रुपये अपेक्षित आहेत. तथापी किती फुटावर पाया लागेल यावर हा खर्चाचा अंदाज असल्याचे शाखा अभियंता अमोल कोळी यांनी सांगितले.
दरम्यान, नागरीकांना चालत ये-जा करण्यासाठी तसेच सर्वेक्षण करण्यासाठी सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, उपअभियंता एस.एस.एरेकर, शाखा अभियंता अमोल कोळी, पन्हाळ्याचे मुख्याधिकारी स्वरूप खर्गे, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, पप्पू धडेल आदी उपस्थित होते.