सावरवाडी : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील पंचवीस गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बीडशेड ते बहिरेश्वर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम गेल्या दोन महिन्यापासून रखडले आहे. रस्ता दुरुस्तीचे काम थंडावल्याने ग्रामीण वाहतुकीची गैरसोय निर्माण झाली आहे.
मुख्य रस्त्याची सध्या अवस्था बिकट आहे. रस्त्याच्या दुतर्फा गारवेलीचे साम्राज्य वाढलेले आहे. दोन ठिकाणी असलेल्या ओढ्यावरील मोरीचे नव्याने होणारे बांधकाम रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. अपुऱ्या निधीमुळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले गेले. रस्त्यामध्ये प्रचंड स्वरूपाचे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
रस्त्याच्या दुतर्फा नाले नसल्यामुळे पावसाळ्यात शेतीमधील पाणी रस्त्यावर येते. शिवाय रस्त्यावरून वाहतूक करणे कठीण होते. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम थंडावलेले आहे.