खरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:23 AM2021-04-15T04:23:38+5:302021-04-15T04:23:38+5:30
कोल्हापूर : आगामी पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, माॅलमध्ये बुधवारी दिवसभर ...
कोल्हापूर : आगामी पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, माॅलमध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला होता. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तर चक्क तासभर प्रतीक्षा करावी लागली.
राज्यात आगामी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरू झाली. गतवर्षी सलग दोन महिने झालेल्या संचारबंदीचा अनुभव असल्यामुळे, यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, कडधान्ये खरेदी करून ठेवण्याचा आटापिटा नागरिकांनी केला.
मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा झाली, त्यामुळे बुधवारचा दिवस उजाडताच शहरातील बाजारपेठेत सकाळी नऊ वाजल्यापासूनच गर्दी व्हायला लागली. धान्य बाजार, मिरची बाजार, शिवाजी मार्केटमधील दुकानगाळे, शहरातील सर्वच भाजी मंडई गर्दीने फुलून गेल्या. पुढील पंधरा दिवस घरात बसून करता येणाऱ्या कामांच्या अनुषंगानेही खरेदी झाली. काहींनी लग्नाच्या निमित्ताने खरेदी केली. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल होता. विविध प्रकारच्या बिस्किटांपासून ते विविध प्रकारचे बेकरी खाद्य, अंडी खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.
महाद्वाररोड, ताराबाईरोड, कपिलतीर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी पाच बंगला या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. शहराच्या विविध भागातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी मांडलेल्या फळ बाजारातही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. उपनगरांतील भाजी मंडईतूनही नागरिकांची गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही मोठ्या दुकानांतून तसेच मॉलमध्ये लोकांनी रांगा लावून खरेदी केली. रंकाळा व ताराबाई पार्क येथील मॉलमध्ये तर प्रवेश मिळविण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागत होती.
संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे पेट्रोलपंप सुरू राहणार आहेत. परंतु आपणाला बाहेर पडायची अडचण झाली, तर वाहनात पेट्रोल असलेले बरे, म्हणून अनेकांनी पेट्रोलची खरेदीही केली. काही पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या.
गावी जाण्याची धांदल
कोल्हापूर शहरात हॉटेलमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, पंधरा दिवस बसून कसे काढायचे? असे म्हणत आपल्या गावाचा रस्ता धरला. विशेषत: कोकणातून आलेले मजूर, कामगार यांनी त्यांच्या त्यांच्या गावास जाण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे एस.टी. गाड्याही प्रवाशांनी भरून गेल्या. तसेच पुणे, मुंबईसह अन्य शहरात काम करणाऱ्या मूळच्या कोल्हापूरकरांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. नोकरीनिमित्त बाहेरच्या जिल्ह्यात असलेले अनेक नागरिक कोल्हापुरात आपल्या घरी दाखल झाले आहेत.
(बाजारपेठ नावाने फोटो देत आहे)