कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटबाबत सध्या आपणाला काही बोलायचे नाही; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका त्यांनी कडेपर्यंत न्यावी, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत लगावला. स्वबळाची तयारी म्हणूनच भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांना जवळ केले, आता ते मागे हटण्याची शक्यता नसल्याने युती होवो अथवा न होवो विधानसभेला तिरंगीच लढत होईल, असेही त्यांनी सांगितले.जिल्हा बॅँकेच्या ताळेबंदाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पा मारताना मुश्रीफ यांनी सावध भूमिका व्यक्त केली. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी आघाडीच्या दोन्ही जागा निवडून येणार हे निश्चित आहे.
गेल्यावेळेलाही शिवसेनेच्या उमेदवाराला कागलमध्ये मताधिक्य मिळालेच होते, असे सांगत हसन मुश्रीफ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे दुपारी तीननंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापुरात तर तीन नंतर २५ टक्के मतदान झाले, हे कशाचे द्योतक आहे? एक सुप्त लाट जाणवत होती, ती नेमकी सरकारच्या कारभाराच्या विरोधात होती का? हे २३ मे रोजी समजेल.लोकसभेचा निकाल लागायच्या अगोदरच युतीमध्ये फटकेबाजी सुरू असल्याबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची म्हणून भाजपने प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांना घेतले, त्यांना पदे देऊन ताकद दिल्याने ते गुडघ्याला बाशिंग बांधूनच उभे आहेत; त्यामुळे युती झाली अथवा नाही झाली, तरी तिरंगी लढत होणारच आहे.अरूंधती महाडिक यांचे कौतुकलोकसभा निवडणुकीत ‘भागीरथी’ संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक या कमालीच्या राबल्या. एक खासदाराची पत्नी आपल्या पतीसाठी किती परिश्रम घेते, हे चांगले उदाहरण असून, त्यांचे कौतुक केले पाहिजे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘त्यांना’ विधानसभेला विचारतीलसाखर उद्योगाबाबत आपणच फार चिंता करता, शिवसेना-भाजपचे कारखानदार बोलत नाहीत, यावर मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आणि साखर कारखानदारीतील कार्यकर्ता म्हणून ही भूमिका मांडत असतो. शिवसेना-भाजपच्या कारखानदारांचा प्रश्न आहे; पण एफआरपी न दिल्यास त्यांना विधानसभेला शेतकरी निश्चितच विचारतील.