रुईकर कॉलनी भाजी मार्केटची दुरवस्था
By Admin | Published: January 11, 2017 12:49 AM2017-01-11T00:49:46+5:302017-01-11T00:49:46+5:30
महापालिकेचे दुर्लक्ष : लिशा हॉटेलजवळील विक्रेत्यांना मार्केटमध्ये हलविण्याची गरज
गौरव शिंदे --कदमवाडी --रुईकर कॉलनी येथील महानगरपालिकेच्या एलिगंट मार्केटची दुरवस्था झाली आहे. भाजी विक्रेते व ग्राहकांपासून मार्केट ओस पडले आहे. महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
रुईकर कॉलनी व परिसरातील नागरिकांना जवळच भाजीपाला मिळावा व भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय करता यावा, यासाठी महानगरपालिकेच्यावतीने याठिकाणी मोठे भाजी मार्केट उभारण्यात आले; परंतु सध्या या मार्केटची दुरवस्था झाली असून, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, मार्केटमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले आहे. सभोवती झाडे-झुडपे, कचरा पसरला आहे.
या मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणत: ५0 ते ६0 व्यावसायिक याठिकाणी आपला व्यवसाय करू शकतात, तसेच येथे ३0 गाळे आहेत, परंतु त्यातील बहुतांशी गाळे बंद अवस्थेत आहेत. या मार्केटमध्ये महानगरपालिकेकडून वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच व्यावसायिक भाजी विकताना पाहायला मिळतात. या मार्केटमध्ये काही भाजी विक्रेत्यांनी सी.सी.टी.व्ही. बसविला होता; परंतु मध्यंतरी तो चोरीला गेल्यामुळे येथे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हे मार्केट रात्रीच्यावेळी मद्यपींचा अड्डा बनलेले असते. तसेच येथे मद्याच्या बाटल्यांचा ढीग पाहायला मिळतो.
याठिकाणी दोन-चार भाजी विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत. येथे ग्राहकही जास्त प्रमाणात येत नसल्यामुळे भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करणे अवघड झाले असल्याची प्रतिक्रिया भाजी व्यावसायिकांनी व्यक्त केली. या मार्केटची पालिकेने स्वच्छता करून लिशा हॉटेल परिसर, कदमवाडी व आजूबाजूला रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना एकत्र आणण्याची गरज आहे.
या मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी फार कमी प्रमाणात ग्राहक येत असल्यामुळे व्यवसाय करणे कठीण बनले आहे. नाईलाजाने आम्ही येथे बसत आहोत.
- बबन घोडके, भाजी विक्रेता.