सत्ताधारी नेते पुन्हा मल्टिस्टेटचा डाव मांडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:23 AM2021-05-01T04:23:58+5:302021-05-01T04:23:58+5:30
(चंद्रदीप नरके यांचा फोटो वापरावा) लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दूध उत्पादक सभासदांच्या पाठबळावर ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडला. ...
(चंद्रदीप नरके यांचा फोटो वापरावा)
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दूध उत्पादक सभासदांच्या पाठबळावर ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा डाव हाणून पाडला. सत्तारूढ गटाने मल्टिस्टेटचा प्रस्ताव मागे घेतला. मात्र, कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहे, असे म्हटले नव्हते. त्यामुळे भविष्यात या मंडळीच्या ताब्यात सत्ता गेली तर ते पुन्हा मल्टिस्टेटचा डाव मांडतील, अशी माहिती माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
नरके म्हणाले, मल्टिस्टेटविरोधात निकराची लढाई दिल्यानंतर हा संघ दूध उत्पादकांच्या ताब्यात राहिला. हा प्रस्ताव मागे घेताना तत्कालीन अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी केंद्रीय निबंधकांकडे निवेदन करताना हा प्रस्ताव सध्या तात्पुरता स्थगित केला आहे, चुकून सत्ता त्यांच्या हातात गेली, तर हा प्रस्ताव पुन्हा रेटण्याचा धोका आहे. दूध उत्पादकांच्या भल्यासाठी ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन घडवावे.
सत्तारूढ गटाच्या नेत्यांना गोकुळमध्ये काहीही करून सत्ता हवीच आहे. काहीही झाले तरी संघ आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे यासाठीच त्यांनी मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव आणला. आपल्या संबंधित लोकांना व्यक्तिगत सभासद करून त्यांच्या जोरावर सत्ता मिळवायची हा त्यांचा प्रयत्न होता. ज्यांच्या घामावर संघ उभा राहिला आहे. त्या जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थेच्या प्रतिनिधींचे महत्त्व कमी झाले असते.
म्हणूनच सत्तारूढ नेते ठरावधारकांच्या दारात..
गोकुळ मल्टिस्टेटचा निर्णय रद्द झाल्यानेच जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान झाला आहे. त्यामुळेच सत्तारूढ गटाचे नेते या ठरावधारकांच्या दारात जाऊन मतासाठी विनवणी करीत आहेत. दूध उत्पादकांचे संघातील महत्त्व कायम ठेवण्यासाठी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला विजयी करण्याचे आवाहन चंद्रदीप नरके यांनी केले आहे.