मोहन सातपुते
उचगाव : उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर असून सध्या रनवे सेफ्टी एरियाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. या रनवे सेफ्टीचा उपयोग भविष्यात विमान दुर्घटना किंवा विमानातील बिघाड, तांत्रिक अडचणींसाठी उपयुक्त ठरणार आहे.
कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १३७० मीटर असून ती २३०० मीटरपर्यंत वाढवण्यात येत आहे. या धावपट्टीसाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन झाले असून २३०० मीटर धावपट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रेसामुळे नाईट लँडिंगसह इतर अनेक प्रलंबित परवाने मिळण्याचा मार्ग सुकर होणार असून रेसासाठी किमान तीस एकर जागेचे तातडीने भूसंपादन होणे गरजेचे आहे.
कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त ६४ एकर जमिनीचे दोन टप्प्यात संपादन होणार असून पहिल्या टप्प्यात तीस एकर जमीन संपादनाची प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने पालकमंत्री सतेज पाटील यांना दिली. पालकमंत्री लक्ष्मीवाडी येथे बैठकीसाठी व भूसंपादन होणाऱ्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गडमुडशिंगी येथे चार दिवसांपूर्वी आले होते.
संपादित जमिनीच्या लगत असणाऱ्या तीस एकर जागा प्राधान्याने संपादित केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित ३४ एकर जागेमध्ये फनेल झोनसाठी आवश्यक सिग्नल्स व लाइट्स बसवण्यात येणार आहेत. दोन टप्प्यातील भूसंपादन प्रशासनाच्या सोयीचे होणार आहे. विमानतळाच्या चौसष्ठ एकर भूसंपादनासाठी प्रशासनाने २७ कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु चालू बाजार भावाच्या पाचपट नुकसान भरपाई देऊन जमिनी खरेदी करावयाच्या असल्यास ही रक्कम तोकडी आहे. शासनाकडून संपादनाच्या कामासाठी दहा कोटी निधी उपलब्ध झाला असून पहिल्या टप्प्यात या रकमेचा विनियोग करून भूसंपादन करणे प्रशासनाला सोयीचे ठरणार आहे.
चौकट : भूसंपादनानंतरही हुपरी रोड सुरू राहणार
६४ एकर भूसंपादनमध्ये कोल्हापूर- हुपरी रोड येत असल्यामुळे सदर रस्ता वळवून न्यू वाडदे गावातून घेण्याविषयी चर्चा सुरू होती. परंतु या ठिकाणी धावपट्टी किंवा तत्सम बांधकाम होणार नसल्यामुळे भूसंपादन केल्यानंतरही कोल्हापूर- हुपरी रोड विनाव्यत्यय सुरू राहणार आहे.
संपादित जागेभोवती तारेचे कुंपण घालून संपूर्ण भाग संरक्षित करण्यात येणार आहे. रस्त्यामुळे संपादित भूभाग दोन भागांमध्ये विभागला जाणार आहे. धावपट्टीशी संलग्न भूभागाला संपूर्ण कुंपण व उर्वरित उत्तरेकडील भूभागाला स्वतंत्र कुंपण घालण्यात येणार आहे. या दोन्ही कुंपणाच्या दरम्यान हुपरी कोल्हापूर वाहतूक सुरू राहू शकते, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
चौकट : रेसा म्हणजे काय...
सध्या विमानतळावरील आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकानुसार आपत्कालीन परिस्थितीत एखादे विमान नादुरुस्त अथवा अपघातग्रस्त झाल्यास ते विमानांच्या रहदारी मार्गापासून दूर एका विशिष्ट ठिकाणी थांबवण्यात येते. त्या ठिकाणास रेसा म्हणतात.
फोटो : ३० उजळाईवाडी विमानतळ
रनवे सेफ्टी एरियाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.