कारभारणींच्या उमेदवारीसाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:23 AM2021-03-31T04:23:21+5:302021-03-31T04:23:21+5:30
ज्योती पाटील पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या ...
ज्योती पाटील
पाचगाव : प्रभाग क्रमांक ६५, राजेंद्रनगर हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागात आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे धावपळ सुरू केली आहे. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यातून नाराजीही उद्भवण्याची शक्यता असून बंडखोरांना शांत करण्याचे आव्हान नेत्यांसमोर उभे ठाकणार आहे. या प्रभागात जवळजवळ ६० टक्के मतदार हे झोपडपट्टीधारक आहेत. हा प्रभाग १० ते १२ कॉलन्यांनी बनला आहे.
२००५ मध्ये गोरख माने यांनी अपक्ष निवडून येऊन या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१० मध्ये राजश्री साबळे या प्रभागातून महापालिकेत गेल्या होत्या. २०१५ मध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीत काँग्रेसच्या लाला भोसले यांनी राष्ट्रवादीच्या मुस्ताक मलबारी यांचा १५९ मतांनी पराभव करत महापालिका गाठली होती.
सध्या हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला असून गेली अनेक वर्षे लोकांच्या संपर्कात असलेल्या शशिकांत पाटील यांनी पत्नी शुभांगी पाटील यांच्यासाठी काँग्रेसमधून उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसमधून अर्चना बिरंजे, स्नेहा मयूर पाटील, छाया कांबळे, संगीत चक्रे, वैशाली मिसाळ यांचीही नावे चर्चेत आहेत, तर अन्य पक्षांतून कोमल बिरजे, नागटिळे हेही इच्छुक आहेत.
गत निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते...
लाला भोसले : (काँग्रेस) १४९५
मुस्ताक मलबारी : (राष्ट्रवादी) १३३६
प्रदीप डवरी : (अपक्ष) 124
मोहन मोरे : (शिवसेना) ९२
कोट :
गेल्या पाच वर्षात या प्रभागात दोन कोटी साठ लाख रुपयांची विकासकामे केली असून भागातील अनेक समस्या सोडवल्या आहेत. यामध्ये रस्ते, गटर्स, गार्डन, पाईपलाईन, ओपन जिम ही कामे मार्गी लावली आहेत.
- विद्यमान नगरसेवक : लाला भोसले : (काँग्रेस)
सोडविलेले प्रश्न : अंतर्गत रस्ते, गार्डन, प्रभागातील गटर्स, पाण्याच्या पाईपलाईन, एलईडी, ओपन जिम, वृक्षारोपण...
प्रभागातील समस्या...
पाणीटंचाई, ड्रेनेज लाईनची मुख्य समस्या असून बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकलेली नाही,
रस्त्यावरच कचरा पसरत असल्याने दुर्गंधी पसरते, अनेक ठिकाणची गटर्स व्यवस्थित नसल्याने दुर्गंधी पसरते व नागरिकांना आजाराचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणचे रस्ते उखडले आहेत.