शहिदांच्या कुटुंबीयांचा त्याग अनमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:06 AM2018-12-10T01:06:29+5:302018-12-10T01:06:33+5:30
सेनापती कापशी : शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मिळालेली मदत शाळेच्या इमारतीला दिली आहे. मुलांना चांगले शिक्षण ...
सेनापती कापशी : शहीद जवान साताप्पा पाटील यांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून मिळालेली मदत शाळेच्या इमारतीला दिली आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता वीरपत्नी अश्विनी पाटीलसह पाटील कुटुंबीय व ग्रामस्थांनी केलेल्या मदतीतून ही सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. शहीद जवानाच्या कुटुंबीयांनी केलेला त्याग अनमोल असल्याचे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी केले. बेलेवाडी मासा (ता. कागल) येथे जयशिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शहीद जवान साताप्पा महादेव पाटील विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती व्ही. बी. पाटील होते.
यावेळी संजय मंडलिक म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते या इमारतीचा पायाभरणी समारंभ झाला होता. त्यांच्या हस्तेच या इमारतीचे उद्घाटन व्हावे अशी लोकभावना होती; पण आज मंडलिक नाहीत, पण आम्ही ज्यांना वडीलस्थानी मानतो असे शाहू छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. मंडलिकांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या करता दुर्गम भागात शाळा सुरू केल्या. साताप्पा पाटील हे सीमेवर रक्षण करत असताना शहीद झाल्यानंतर क्षणात माजी खासदार मंडलिक यांनी साताप्पा पाटील यांचे नाव शाळेला दिले. वीरपत्नी अश्विनी पाटील, वीरमाता आनंदी पाटील, वीरपिता महादेव पाटील यांनी केलेल्या त्यागातून व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याने याठिकाणी शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली.
व्ही. बी. पाटील, कर्नल आर. के. तिम्मापूर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, वीरपत्नी अश्विनी पाटील, संदीप राजगोळकर, श्रीपतराव शिंत्रे, सदाशिव आंबोशे, आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार वीरेंद्र मंडलिक यांनी मानले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, वीरपिता महादेव पाटील, वीरमाता आनंदी पाटील, प्रदीप चव्हाण, दत्तात्रय चौगले, विश्वास कुराडे, शशिकांत खोत, सुभेदार मेजर माणिक थोरात, प्रकाश नारायण पाटील, जे. डी. मुसळे, धनाजी काटे, मुकुंद बोडके, आदी उपस्थित होते.