कोल्हापूर : शहरात सेफ सिटी प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या वादग्रस्त सीसीटीव्ही प्रणालीचे ठेकेदारास देय असलेले बिल महानगरपालिका प्रशासनाने रोखले. सोमवारी (दि. २७) ठेकेदारास बिल अदा केले जाणार होते, तोपर्यंत महासभेत प्रकल्पाच्या क्षमतेवर जोरदार आक्षेप घेतल्यामुळे प्रशासनाने सुमारे ३.५० कोटींचे बिल रोखले. तत्पूर्वी मंगळवारी दुपारी विरोधी पक्षनेता संभाजी जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना पत्र देऊन ठेकेदाराचे बिल अदा करू नये, अशी सूचना केली होती. कोल्हापूर शहराच्या सुरक्षेबाबत महानगरपालिका प्रशासनाने सेफ सिटी प्रकल्पांतर्गत १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सध्या हा प्रकल्प कार्यान्वित झाला असल्यामुळे त्यातील उणिवा, त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकल्पात घोटाळा झाल्याची तक्रार सोमवारच्या महासभेत नगरसेवक भूपाल शेटे यांनी करताच प्रकल्पाचे बिंग फुटले. मंगळवारी दुपारी संभाजी जाधव यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट घेऊन सेफ सिटी प्रकल्पाच्या ठेकेदाराचे देय असलेले बिल देण्यात येऊ नये म्हणून पत्र दिले. सोमवारी काही अधिकारी ठेकेदाराचे ३.५० कोटी रुपयांचे बिल अदा करण्याच्या प्रयत्नात होते. तोपर्यंत महासभेत या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाल्याने ठेकेदारासह अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. तांत्रिक लेखापरीक्षण सुरू महानगरपालिकेच्या सभेत सोमवारी झालेल्या चर्चेनंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी तातडीने या प्रकल्पाचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे महानगरपालिका अधिकारीही कामाला लागले आहेत. तांत्रिक लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल आल्यावरच नेमकी माहिती आणि तक्रारीतील तथ्य बाहेर येणार आहे. (प्रतिनिधी)
‘सेफ सिटी’चे बिल रोखले
By admin | Published: June 29, 2016 12:56 AM