भगव्या वातावरणात छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, आबालवृध्द झाले सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:27 PM2021-02-19T19:27:14+5:302021-02-19T19:30:29+5:30
Shivjayanti Kolhapur-चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, शाहिराच्या डफाचा घुमणारा आवाज, शिवरायांचा जयघोष अशा प्रेरणादायी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शुक्रवारी करवीरवासियांनी मानाचा मुजरा केला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरवणुका टाळून चौकाचौकातील जयघोषामध्ये अबालवृध्द सहभागी झाले.
कोल्हापूर : चौकाचौकात लावलेले भगवे ध्वज, शाहिराच्या डफाचा घुमणारा आवाज, शिवरायांचा जयघोष अशा प्रेरणादायी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शुक्रवारी करवीरवासियांनी मानाचा मुजरा केला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरवणुका टाळून चौकाचौकातील जयघोषामध्ये अबालवृध्द सहभागी झाले.
गेले दोन दिवस शहरामध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू होती. मात्र या चार, पाच दिवसातच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने साहजिकच प्रशासनाने दक्षतेची भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवभक्तांचा थोडा हिरमोड झाला. ठिकठिकाणी पोवाडे, मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.चौकाचौकात शिवपुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगव्या पताका वाऱ्याबरोबर लहरत होत्या. शिवाजी पेठ, बुधवार पेठ,कसबा बावडा परिसरातील शिवपुतळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
येथील नर्सरी बागेमध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या पहिल्या ऐतिहासिक शिवाजी मंदिरात सकाळी १० वाजता शिवजन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी चांदीच्या पाळण्याची यशस्वीनीराजे आणि यशराजराजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यावेळी उपस्थित होते.
शिवाजी चौकातील पुतळ्यासमोरही शिवजन्मसोहळा संपन्न झाला. यावेळी शाहू छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. योेगेश जाधव, विजय देवणे, माजी महापौर निलोफर आजरेकर, आदिल फरास, आर.के.पोवार, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मिरजकर तिकटी येथे मावळा ग्रुपतर्फे भव्य शिवपुतळा उभारण्यात आला आहे. दुपारी मधुरिमाराजे आणि जयश्री जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्म सोहळा संपन्न झाला. त्यांच्यासोबत कोरोना काळात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनाही पाचारण करण्यात आले होते. संध्याकाळी मल्लखांबाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. अध्यक्ष उमेश पवार, संदीप बोरगावकर, युवराज पाटील, अमोल गायकवाड, अभिजित भोसले, संतोष हेब्बाळे, रमाकांत बिल्ले यांनी सहकाऱ्यांसह कार्यक्रमाचे नियोजन केले.
चिमुकल्यांचा अपार उत्साह
सायकलीला फडफडणारा भगवा ध्वज.. त्यावर शिवछत्रपतींची प्रतिमा आणि मुखात राजेंचा जयजयकार करत फिरणारी मुले साऱ्या शहरभर दिसत होती. शहर असो की गाव तिथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. भल्या पहाटेपासून तरुण शिवज्योत घेवून धावत गावी जाताना सर्वत्र दिसत होते.
करवीर नादचा ताल
करवीर नाद या ढोलपथकाने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर आपल्या वादन कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले. या पथकाच्या युवा सदस्यांनी ढोल, ताशाच्या तालावर उपस्थितांना डोलायला लावले. अनेकांनी यावेळी या वादनाचे मोबाईवर चित्रीकरण करून घेतले.